

Nagaon Steel Yard Crane Accident
नागाव : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नागाव फाटा येथील स्टील यार्ड कंपनीत लोखंडी प्लेटा उचलणारी क्रेन अंगावर पलटी होऊन परप्रांतीय कामगार ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास घडली. राशीद खान (वय ३८, मुळ गाव गोरखपूर, जिल्हा महाराजगंज, उत्तरप्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.
घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, नागाव फाटा येथील प्रितम स्टील कंपनीत बाहेरून स्टील (लोखंडी ) प्लेटा घेवून आलेल्या ट्रेलर ( आर जे १४ जी एल ८६२९ ) मधून क्रेनच्या मदतीने प्लेटा खाली उतरवण्याचे काम सुरू होते. राशिद हा ट्रेलरवर जावून प्लेटा वायरूपच्या साह्याने बांधून क्रेन चालकाला जिथे ठेवायच्या आहेत ती जागा दाखवत होता. पण अचानक क्रेनला प्लेटाचे ओव्हर लोड वजन झाल्याने क्रेन पलटी होऊन त्यामध्ये राशिद क्रेन खाली सापडला. त्याचा कंबरे खालील भागास गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेवून अपघाताची माहिती घेत असताना येथील कर्मचाऱ्यांकडून ही प्रायव्हेट मालमता आहे. येथे येण्यास मज्जाव केला व घडलेल्या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्या अगोदर परस्पर घटना लपवण्याच्या प्रयत्न सुरू होता. परंतु, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत कंपनी व्यवस्थापनाची चांगलीच कानउघाडणी केली. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसांत झाली आहे.