

Shirdhon Gram Panchayat Shahir Bandar Hunger Strike
शिरढोण : ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून ५० टक्के करसवलतीतून जमा झालेली रक्कम परस्पर खर्च केल्याच्या निषेधार्थ शिरढोण येथील सामाजिक कार्यकर्ते शाहीर बाणदार यांनी आजपासून (दि. २६) ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. गावसभेच्या ठरावाला हरताळ फासल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
शिरढोण ग्रामपंचायतीच्या गावसभेत सवलतीतून जमा होणारी कररक्कम स्वतंत्र बँक खात्यात जमा करून २६ जानेवारीच्या पुढील गावसभेपर्यंत खर्च न करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. मात्र, हा ठराव डावलून ग्रामसेवकांनी ही रक्कम अनामत देणी भागविण्यासाठी वापरल्याचा आरोप बाणदार यांनी केला आहे.
गावसभा ही गावातील सर्वोच्च निर्णय प्रक्रिया असून तिच्या ठरावांकडे दुर्लक्ष होणे लोकशाही मूल्यांना बाधक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार सादर केली आहे. करसवलतीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांसह मोठ्या थकबाकीदारांनाही मिळत असल्याने ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणावर करसंकलन झाले आहे.
मात्र, ही रक्कम ठरावाच्या विरोधात खर्च झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उपोषणास उमेश सासणे, उमेश हावगुंडे, सचिन मालगावे, सुधाकर खोत, मनोज गुरवान, चंद्रकांत मालगावे, विजय मगदूम, विश्वास बाली घाटे आदींसह अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे बोनस व पगार भागविण्यासाठी इतर ठिकाणाहून अनामत रक्कम घेतली होती. सदर रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने आम्ही सवलत कर रक्कमेतील पैसे खर्च टाकले आहेत.
- विराज जथे, ग्रामसेवक