

कुंभोज : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मुसळधार पावसाने घरांची पडझड सुरूच आहे. कुंभोजसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या वाल्मीक दावीद घाटगे व इंदूबाई रजनीकांत भोरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घाटगे आणि भोरे कुटुंबाने केली आहे.
ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. जीवितहानी झाली नाही. सुदैवाने अनर्थ टाळला. घाटगे व भोरे हे दोन कुटुंबीय मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. घाटगे व भोरे कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती असून घराची भिंत कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. घटनास्थळी तलाठी जयवंत पोवार यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.