Nitin Gadkari | देशाच्या विकासपुरुषाची प्रतिमा मलीन करण्याच्या षड्‌यंत्राचा सूत्रधार कोण?

इथेनॉल धोरणाच्या सामूहिक जबाबदारीची खापरफोड केवळ गडकरींच्या डोक्यावर; भारतीय जैवइंधन धोरणाची समीक्षा आवश्यक
Nitin Gadkari
Nitin GadkariPudhari
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्‍हापूर : जगात इथेनॉलनिर्मितीमध्ये ब्राझील हा महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. ब्राझीलमध्ये प्रतिवर्षी सरासरी 36 ते 38 अब्ज लिटर्स इतकी इथेनॉलची निर्मिती होते, तर भारतात हेच उत्पादन ब्राझीलच्या 20 टक्क्यांवर म्हणजे अवघे 7 ते 8 अब्ज लिटर्स इतके आहे. 50 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये इथेनॉलनिर्मितीची पायाभरणी झाली. तेव्हापासून आजवर ब्राझीलने उत्पादनात पहिला क्रमांक गाठला. शिवाय, ई-27 प्रतीच्‍या इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर हा तेथील सार्वजनिक जीवनाचा भाग बनला आहे.

ब्राझीलमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणार्‍या गाड्या रस्त्यांवर धावतात आणि पेट्रोल व इथेनॉलमिश्रित पेट्रोल स्वतंत्रपणे विक्रीच्या पंपांची साखळीही तेथे कार्यरत आहे. भारतात 2018 मध्ये बायोफ्युएल पॉलिसी जाहीर करण्यात आली. याचा अर्थ या उद्योगाचे खर्‍या अर्थाने आजचे वय 8 वर्षे आहे. या अल्प कालावधीत भारतासारख्या विराट लोकसंख्येच्या आणि वाहनसंख्येच्या देशात हे अडथळे येणार, हे अपेक्षित होते. परंतु, या संक्रमण काळातील व्यवस्थापन ज्या कटाक्षतेने करणे आवश्यक होते, त्याकडे दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही. परंतु, याचा अर्थ त्याचे खापर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यावर फोडणे व्यवहार्य नाही. शिवाय, या राजकीय घडामोडींत इथेनॉललाच जर नाकारण्याचा प्रयत्न झाला, तर प्रगतीची चाके जमिनीत रूतून बसण्याचा धोका आहे.

गडकरींच्या कुटुंबीयांना लाभधारक ठरण्यासाठी इथेनॉल धोरण असल्याचा आरोप गैरवाजवी आणि अनाठायी आहे. कारण, इथेनॉलची किंमत निश्चित करण्याकरिता जे ब्राझीलियन मॉडेल वापरले जाते त्याचा आधार घेतला, तर इथेनॉलनिर्मितीही अस्थिरतेच्या हिंदोेळ्यावर झुलत असल्याचा अनुभव सांगतो.

जागतिक बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीवर ब्राझीलमध्ये इथेनॉलची निर्मिती अवलंबून असते. तेथे साखर कारखान्यांमध्ये स्वयंचलित सॉफ्टवेअरवर काम चालते. बाजारातील क्रूडच्या किमती वाढल्या की, साखरेचे रूपांतर इथेनॉलमध्ये होते आणि क्रूड घसरले की, ऊस साखरनिर्मितीकडे वळतो. कोरोनाचा अपवाद वगळता जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव इथेनॉलनिर्मितीसाठी पोषक होते. आखातातील युद्धकाळात क्रूडचे दर भडकल्याने इथेनॉलची नितांत गरज अधोरेखित झाली होती. युद्धसमाप्तीचा शंख फुंकताच 110 डॉलर्स प्रतिबॅरलवरील क्रूड 70 डॉलर्सपर्यंत खाली आहे. याचा अर्थच इथेनॉल उद्योग हा संवेदनशील उद्योग आहे. जागतिक बाजारात इथेनॉलच्या हमीभावापेक्षा क्रूड स्वस्त झाले, तर या उद्योगाभोवती असुरक्षितता निर्माण होऊ शकते. जशी आधारभूत किंमत वाढविली गेली, तशी ती कमीही होऊ शकते. मग यातून गडकरींच्या कुटुंबीयांच्या लाभाचा प्रश्न आलाच कोठून? महाराष्ट्रात 1995 ते 1999 या कालावधीत शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री होते. तेव्हा मुंबईत उड्डाणपुलांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला. हे उड्डाणपूल बनविले गेले नसते, तर आज मुंबईची अवस्था काय झाली असती? या कल्पनेने अंगावर शहारे येतात. (उत्तरार्ध)

गडकरींचे यश भाजपच्‍या वरिष्‍ठांना खुपते आहे?

देशातील दळणवळणाच्या मुख्य प्रश्नाला चोख उत्तर दिल्यामुळेच भारतात परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. यामुळेच मराठमोळे, दिलखुलास गडकरी विरोधकांच्याही गळ्यातील ताईत बनले होते; मग अचानक त्यांच्यावर टीका सुरू होण्यामागे नेमके कोण आहे? तेही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हे उद्योग सुरू आहेत. राजधानी दिल्लीत माध्यमांच्या वर्तुळात गडकरींचे हे यश भाजपच्याच वरिष्ठ वर्तुळात खुपत असल्याचे उघडपणे बोलले जाते; मग याविरोधामागे कोण आहे? या षड्‌यंंत्राचा नेमका सूत्रधार कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळ सांगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news