

सुनील कदम
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खासगी सावकारीला अक्षरश: उधाण आलेले आहे. सावकारी पाशात अडकून हजारो कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. हजारो कुटुंबांची वाताहत झाली आहे, तर हजारो कुटुंबे सावकारांच्या दहशतीमुळे परमुलखात परागंदा झाली आहेत. आजकाल हे सावकार इतके मुजोर झाले आहेत, की ते कोणत्याही शासकीय यंत्रणेला भीक घालत नाहीत.
मागील पाच-पन्नास वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात साकारलेली हरित क्रांती, मोठ्या प्रमाणात वाढलेले बागायत क्षेत्र, सहकारी साखर कारखानदारीचे जाळे, गावागावांत आकाराला आलेल्या पतसंस्था-सहकारी सोसायट्या-दूध संस्थांचे जाळे, औद्योगिक प्रगती यामुळे राज्याच्या अन्य भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक समृद्धी लक्षवेधी आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून या आर्थिक समृद्धीलाच सावकारीचे पाय फुटलेले दिसत आहेत. पाच-पन्नास लाख गाठीशी बांधून असलेल्या अनेक धेंडांनी खासगी सावकारीचे दुकान थाटलेले दिसत आहे. याशिवाय हजारो बेरोजगार युवक, गुन्हेगार यांनीही सावकारी हेच आपल्या उपजीविकेचे साधन बनवून टाकले आहे. काही महाभाग तर सहकारातील पैसा खासगी सावकारीकडे वळविताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांचा अपवाद वगळला तर गावगन्ना खासगी सावकारांचे पेव फुटलेले दिसत आहे.
पठाणांना लाजवणारे व्याज!
बँका-पतसंस्थांच्या जाचक, वेळकाढू आणि काहीशा खर्चिक नियमांमुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आणि गरजू लोक आपल्या आर्थिक अडीअडचणीच्या वेळी खासगी सावकारांना शरण जातात. पण, एकदा का कुणी या सावकारी चरकात अडकला की सहजासहजी त्याची सुटका होत नाही. मूळ मुद्दलाच्या दहा-वीस पट व्याज दिले तरी सावकाराचे देणे काही फिटत नाही. व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज, दंड, वसुली फी, वसुली खर्च आदी विविध कारणे सांगून सावकारांच्या देण्याचा आकडा वाढतच जातो. शिवाय याविरुद्ध कुठे दाद मागण्याचीही सोय राहात नाही. कारण, बहुतेक सगळ्या सावकारांनी वसुलीसाठी आपल्या पदरी गुंडांच्या फौजाच तैनात केल्या आहेत. या गुंडांच्या दहशतीमुळे कर्जदार सहसा पोलिस ठाण्याची पायरी चढताना दिसत नाहीत. एखाद्याने जर तक्रार केलीच तर त्यातून फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही. कारण, बहुतेक सगळे सावकार कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे ठेवून असतात. परिणामी, लगेचच खालपासून वरपर्यंत चक्रे फिरून सावकार मंडळी कायद्याच्या कचाट्यातून अलगद सुटतात, असा अनेक कर्जदारांचा अनुभव आहे.
सावकार ते सरकार!
गेल्या तीन-चार महिन्यांत राज्यातील नगरपालिका, महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे ‘निवडून येण्याची क्षमता’ या निकषावर बहुतांश राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्याने शेकडो खासगी सावकार या निवडणुकांमध्ये निवडून आलेले दिसतात, म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ‘सरकार’मध्येच सामील झाले आहेत. खासगी सावकार ते सरकार असा त्यांचा प्रवास भविष्याच्या द़ृष्टीने धक्कादायक मानावा लागेल. असे शेकडो सावकार आज काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कारभारी’ म्हणून मिरवताना दिसतात. अशांच्या अत्याचाराविरुद्ध दाद कोणाकडे आणि कशी मागायची, हाच एक गहन सवाल बनला आहे.
मांडवातून नवरदेव-नववधू थेट सावकाराच्या दावणीला!
सांगली जिल्ह्यातील एका सधन गावातील एका मजुराने आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी शेजारच्या गावातील एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. पण हे कर्ज न फेडता आल्यामुळे सावकाराच्या भीतीमुळे एक-दोन वर्षे तो कुठेतरी गायब झाला होता. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न ठरले आणि दारातच लग्नही लागले. याची कुणकुण त्या सावकाराला लागल्यावर त्याने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने त्या कर्जदार नवरदेवाला आणि त्याच्या नववधूला त्याच दिवशी आपल्या शेतातील घरात नेऊन रानात चाकरीला ठेवले. त्यानंतर जवळपास चार-पाच वर्षे या जोडप्याने त्या सावकाराची चाकरी करून आपले कर्ज फेडले. असे अनेक प्रकार इथे घडतात.