कोल्हापूर : सहा हजारांवर गावांत टँकरने पाणीपुरवठा!

कोल्हापूर : सहा हजारांवर गावांत टँकरने पाणीपुरवठा!

कोल्हापूर : राज्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण रूप धारण करीत असून, आजघडीला राज्यातील सहा हजारांहून अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे, नाशिक आणि मराठवाडा विभागांतील सर्वाधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यात रोज किमान शंभरभर गावांमधून टँकरची मागणी वाढताना दिसत आहे. आगामी महिनाभरात किमान दहा हजार गावे टंचाईग्रस्त होण्याचा अंदाज आहे.

आजघडीला राज्यातील 1,837 गावे आणि 4,318 वाड्या अशा एकूण 6,155 गावांमध्ये 82 शासकीय आणि 2,199 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभाग हा राज्यातील सर्वाधिक पाणीदार भाग समजला जात असला, तरी आज राज्यातील सर्वाधिक टँकर याच भागात चालू आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील 2,751 गावे आणि वाड्या-वस्त्यांवर 461 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून कोणत्याही गावांत पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही.

पुण्याच्या खालोखाल नाशिक विभागातही पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. नाशिकसह विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांतील 186 गावे आणि 958 वाड्या-वस्त्यांवर 521 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाडा विभागातील 790 गावे आणि 240 वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील 42 गावांमध्ये टँकर सुरू आहेत. कोकणातील 357 गावांमध्ये 91 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात मात्र यंदा पाणीटंचाईच्या फारशा झळा जाणवताना दिसत नाहीत. नागपूर जिल्ह्यातील केवळ दोन गावांमध्ये टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्यभर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. दिवसाकाठी राज्यातील किमान शंभरावर गावे आणि वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे त्या त्या गावांमध्ये तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागत आहे. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास मे महिन्यापर्यंत राज्यातील किमान दहा हजारांवर गावे आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रचारातही पाणी!

सध्या राज्यभर लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. पण प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांना त्या त्या भागातील पाणीटंचाईबद्दल मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही मतदारसंघामध्ये तर पाणीटंचाई आणि दुष्काळ हे प्रचारातील ठळक मुद्दे म्हणून पुढे येताना दिसत आहेत. पाण्याचे टँकर वेळेत येत नाहीत, वेळी-अवेळी केव्हाही टँकर चालकांच्या सोयीनुसार पाणीपुरवठा केला जात असल्याच्याही तक्रारी काही भागातून येताना दिसत आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीतही ठिकठिकाणी पाणीटंचाईचा मुद्दा वारंवार डोकावताना दिसत आहे आणि उमेदवारांना त्याचा सामना करावा लागत आहे.

धरणांमध्ये मर्यादित साठा!

राज्यातील सर्व प्रकारच्या धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता 1,703 टीएमसी इतकी आहे; मात्र सोमवारी राज्यातील धरणांमध्ये केवळ 476 टीएमसी म्हणजेच केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंतचा जवळपास दोन महिन्यांचा कालावधी विचारात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागणार आहे. मराठवाडा, नाशिक आणि पुणे विभागातील धरणांमध्ये तर अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे या भागातील सिंचनासह पाण्याच्या अन्य गरजा भागविण्यासाठी जलसंपदा आणि महसूल विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news