

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती नदीतून बालिंगा उपसा केंद्राकडे रॉ वॉटर घेऊन जाणार्या दगडी चॅनेलची पडझड झाल्याने महापालिकेकडून हे चॅनेल दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्यासाठी शिमगा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला, मुले आणि नागरिकांचीही झुंबड उडत आहे. टँकरच्या चाव्यातून पाणीपुरवठा सुरू असतानाच नागरिक टँकरवर चढून पाण्याच्या घागरी भरून घेत आहेत. पाणीटचाई निर्माण झाल्याने येनकेनप्रकारे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची त्रेधात्रिरपिट उडत आहे. एखाद्या दुष्काळी भागात पाणी भरण्यासाठी टँकरवर जे चित्र दिसते ते चित्र कोल्हापूरसारख्या पाण्याने समृद्ध असणार्या शहरात दिसत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्याने या टंचाईने नागरिक होरपळले जात आहेत.
दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. खरेदीसह तयारीची लगबग सुरू असतानाच घरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने महिलांची धावपळ उडत आहे. दिवसभर पाण्याच्या टँकरसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. त्यानंतर टँकर आला की टँकरभोवती महिला, मुले आणि नागरिकही गराडा घालत आहेत. काही मुले, तरुण टँकरवर चढून टँकरमध्ये पाईप टाकून पाणी खेचतानाचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसत होते. आणखी काही दिवस चॅनेल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या तोंडावर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहरातील फुलेवाडी, रिंग रोड परिसरापासून ते शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, महाद्वार, गुजरी, अंबाबाई मंदिर परिसर पार्वती टॉकीज ते बागल चौकापर्यंतचा परिसर पाणीटंचाईने त्रस्त आहे.