

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाऊस लांबल्याने व धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पंचगंगा व भोगावती नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. 19) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, रविवारीही (दि. 18) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम शुक्रवारी व शनिवारी (दि. 16 व 17) करण्यात आल्याने पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील बहुतांशी भागात अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये ए, बी व ई वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागाचा समावेश आहे.
दरम्यान, सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. सोमवारी ज्या भागात पाणीपुरवठा होईल, त्या भागात मंगळवारी पुरवठा होणार नाही. अशाच पद्धतीने पुढील दिवसांत ज्या-त्या भागात पाणीपुरवठा होणार आहे. नद्यांत पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत दिवसाआड पुरवठा राहणार आहे.