

कोल्हापूर, डॅनियल काळे : सीपीआरमधील सोनोग्राफी विभागात कोणाचा ताळमेळ कोणाला नाही. 7 ते 8 डॉक्टर असूनही आणि चार ते पाच मशिन असूनही दररोज मोठ्या प्रमाणात वेटिंगची वेळ रुग्णांवर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या रुग्णाच्या केसपेपरवर अर्जंट सोनोग्राफी, असा डॉक्टरांचा शेरा असूनही अशा रुग्णांना दोन तासांचे तर इतर रुग्णांना किमान 15 ते 20 दिवसाचे वेटिंग करण्याची वेळ येत आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सोनोग्राफी हा महत्त्वाचा विभाग आहे. कुंभी आणि भोगावती अशा दोन ठिकाणी सोनोग्राफी मशिन उपलब्ध आहेत. दररोज सोनोग्राफीसाठी येणार्या रुग्णांची संख्या मोठी असते. पिवळे कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. इतर रुग्णांकडून 100 रुपये आकारले जातात. खासगी केंद्रात किमान एक ते दीड हजार रुपये मोजावे लागतात.
सोनोग्राफी विभागात 7 ते 8 डॉक्टर आहेत. ओपीडीच्या वेळेतच सकाळी 9 ते दुपारी 1 हा सोनोग्राफीची वेळ आहे. परंतु येथील डॉक्टर प्रत्यक्षात साडेदहा किंवा अकरा या वेळेत येतात. साडेबाराच्या दरम्यान सोनोग्राफी करणे बंद करतात. एका रुग्णाच्या सोनोग्राफीसाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजे पाच तास काम चालणे अपेक्षित असताना दोन तास काम चालते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
किती दिवस वेदना सहन करायच्या
किडनी स्टोनच्या रुग्णांनाही वेटिंगवर ठेवले जाते. भोगावती या इमारतीत सोनोग्राफी मशिन आहेत. परंतु गरोदर माता तिथे गेल्या की त्यांना कुंभी इमारतीत पाठविले जाते. तेथे गेले की, भोगावती इमारतीत जावा, असे सांगितले जाते.