सिद्धनेर्ली : पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये मंडलिक गटाला नेहमीच जाणून बुजून पाडण्याचे कारस्थान करण्यात आलेले आहे. झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत देखील याचा अनुभव आल्याने येत्या विधानसभेला कार्यकर्त्यांच्या इच्छा शक्तीच्या जोरावर मी कागल विधानसभा लढविण्यासाठी तयार आहे. वडीलकीच्या नात्याने आणि मंडलिक साहेबांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांच्या नातवाला विधानसभेला संधी द्यावी, असे आवाहन करत कागल तालुक्यातील दोन्हीही नेत्यांनी सोयीचे राजकारण करत आम्हाला पाडण्याचे काम केले आहे, अशी टीका युवा नेते विरेंद्र मंडलिक यांनी केले. (Kolhapur Politics News)
बामणी (ता. कागल) येथील कार्यालयात झालेल्या शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र प्रदान मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामदेव राव मेंडके होते. यावेळी सुधीर पाटोळे, नेताजी बुवा, राजप्रताप सासणे, रुपाली पाटील, अनिल सिध्येश्वर, महेश लांडगे, भगवान पाटील, विश्वास कुराडे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रम दरम्यान सुमारे १ हजार युवासेना पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी दिल्यास अँन्टी इन्कम्बंसीचा फटका महायुतीला बसू शकतो. दहा पैकी आठ मतदार मुश्रीफ नको म्हणतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मुश्रीफांनी आता थांबावे, असे आवाहन मंडलिक यांनी केले. लोकसभेला कागल तालुक्यातील घटलेल्या मतदानाला जबाबदार धरत मुश्रीफांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उडवली. लोकसभेच्या तोंडावर घाटगे यांनी राजे विरुद्ध जनक घराणे म्हणत प्रचारातही अंतर्गत राजेंनाच मदत केली. आणि आता तुतारी हातात घेत सोयीचे राजकारण करण्यासाठी दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. (Kolhapur Politics News)
यावेळी या कार्यक्रमासाठी परिसरातील विविध पदाधिकारी, नेते, शिवसैनिक, मंडलिक गट, नागरिक उपस्थित होते. संदीप ढेरे यांनी स्वागत केले. तर सुधीर पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. नामदेवराव मेंडके यांनी आभार मानले.
आज झालेल्या मेळाव्या दरम्यान अनेक लोकांनी राजेखान जमादार यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली. बहुतांश वेळी ते कार्यक्रमात देखील उपस्थित राहत नसल्याचे सांगतच वीरेंद्र मंडलिक यांनी भाषण करतानाच आपण त्यांची पदावरून हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद देत जल्लोष केला.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिकांनी मुश्रीफांना राजकीय वारस नेमत आमदार, मंत्री केले. या उपकाराची जाणीव ठेवून खरेतर त्यांनी आता माघार घेऊन मला पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु, गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफांनी मला व माझ्या आत्यांना जाणीवपूर्वक पाडले. शिवाय स्वीकृत म्हणून विरोध केला. लोकसभेला मुश्रीफांनी दगाफटका केला म्हणूनच आमचे लीड १४ हजारांवर आले. असे सांगत हा मेळावा झलक असून पुढे पिक्चर दाखवू, असा इशारा दिला.