

साळवण : कुंभी नदीवरील वेतवडे (ता. गगनबावडा) येथील बंधाऱ्यावरून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या जनार्दन गुंडू शिंदे (६२, रा. वेतवडे) यांचा मृतदेह सलग चार दिवसांच्या युद्धपातळीवरील शोधमोहिमेनंतर रविवारी सकाळी आढळून आला. लोंघे येथील कुंभी नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या मोठ्या झाडाखाली त्यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत व्हाईट आर्मीच्या पथकाला दिसून आला. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि नदीतील पाण्याची पातळी घटल्यामुळे मृतदेह नजरेस पडला. या घटनेने वेतवडे परिसरात शोककळा पसरली आहे. जनार्दन शिंदे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन पी. जी. शिंदे यांचे बंधू होत. तसेच निवडेतील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते.
कुंभी नदीपात्रात झाडामध्ये अडकलेला मृतदेह आढळला
वेतवडे बंधाऱ्यावरून जनार्दन शिंदे हे गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी जात होते. वेतवडे बंधाऱ्याजवळ त्यांची दुचाकी संरक्षण कठड्यालगत सुरू अवस्थेत आढळली. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली; मात्र ते आढळून न आल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. रविवारी कुंभी नदीपात्रात झाडामध्ये अडकलेला मृतदेह आढळला.
पहिल्या दिवशी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शोधमोहीम तातडीने सुरू होऊ शकली नाही. त्यातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजले. अंधार पडल्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्यक्ष शोधमोहीम सुरू करणे अशक्य ठरले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह विविध संस्थांनी शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढला. शोध मोहिमेदरम्यान तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलिस, जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ, व्हाइट आर्मी आणि स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.