वाहन चोरट्यांना कोल्हापुरात अटक : सात दुचाकी जप्त
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह सीमाभागात वाहन चोरी करणार्या सांगली जिल्ह्यातील चौघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 95 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितांकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता तपास अधिकार्यांनी व्यक्त केली.
टोळीकडून 7 गुन्हे उघडकीस
अजय तुकाराम शेवडे (वय 28), गणपती भगवान कुंभार (34), गोरख गणपती झाडे (28), समीर सरदार मुल्लाणी (28, सर्व रा. सांगाव, ता. शिराळा, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि पथकाने ही कारवाई केली. टोळीकडून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. शासकीय रुग्णालय परिसरात संशयित दुचाकी चोरीच्या उद्देशाने वावरत असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप पवार, विठ्ठल जाधव, मंगेश माने, गजानन परीट यांनी सापळा रचून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. कोल्हापूरसह कराड, इस्लामपूर येथून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली.

