[author title=" राजेंद्र जोशी" image="http://"][/author]
कोल्हापूर : कोरोनाच्या एका महाभयंकर साथीचा मुकाबला केल्यानंतर भारतीय लसनिर्मिती व्यवसायात कोरोनाच्या नव्या प्रारूपाला जखडून टाकण्यासाठी लस निर्मितीची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांनी लसीची क्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आणली आहे. जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात कोरोनाच्या 'एक्सबीबी- 1.5' या नव्या प्रारूपाचा समर्थ मुकाबला करणारी लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती समोर आली आहे.
'एक्सबीबी 1.5' या प्रारूपाने सध्या जगात एक नवी चिंता निर्माण केली आहे. भारतात सध्या या प्रारूपाने बाधित असलेला एकही रुग्ण नाही. तथापि, सिंगापूरमध्ये या विषाणूने बाधित अनेक रुग्ण सापडले आहेत. सध्याच्या दळणवळणाच्या गतिमान सुविधांमुळे या विषाणूचा भारतात प्रवेश होऊ शकतो. तत्पूर्वीच कोरोना काळात संपूर्ण जगाला दिलासा देणार्या भारत सरकारने याविषयी प्रथमच पावले उचलली आहेत. डिसेंबरपासूनच या विषाणूला जेरबंद करणार्या लसीच्या संशोधनासाठी संशोधकांनी प्रयत्नांची बाजी लावली होती.
त्याला यश द़ृष्टिपथात आले आहे. हा नवा विषाणू कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रवर्गातील आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लसींद्वारे या विषाणूपासून संरक्षण मिळत नाही. तथापि, बाजारात येणारी नवी लस त्याचा पुरा बंदोबस्त करेल, अशी स्थिती आहे. 'एक्सबीबी 1.5' या विषाणूविरुद्ध लस निर्माण करण्यासाठी हैदराबादस्थित बायोलॉजिकल- ई या कंपनीने लसीच्या क्लिनिकल चाचण्या यापूर्वीच सुरू केल्या आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल जूनमध्येच अपेक्षित आहे.
डिसेंबर 2023 मध्ये धोक्याची जाणीव
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला गेल्या महिन्यातच केंद्रीय औषधे महानियंत्रकांच्या अधिपत्याखालील विषय तज्ज्ञांच्या समितीने आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी त्यांनी बनविलेल्या नव्या लसीला क्लिनिकल चाचण्यांपासूनही सूट दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये या धोक्याची जाणीव दिली होती. अवघ्या पाच महिन्यांत भारतीय लसनिर्मिती कंपन्यांनी त्यामध्ये यश मिळविलेच. शिवाय, विषाणू भारतात प्रवेश करण्यापूर्वीच त्याच्या मुकाबल्याची शस्त्रे तयार झाली आहेत.