नगर / पाथर्डी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन 2024 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नगर तालुक्यातील निंबळक येथील ओंकार राजेंद्र खुंटाळे याने 673 क्रमांक मिळविला. तर, पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी येथील ज्ञानेश्वर बबन मुखेकर यांनी 727 वा क्रमांक मिळवित घवघवीत यश मिळविले.
ओंकार खुंटाळे यांनी प्राथमिक शिक्षण निंबळक येथील माध्यमिक विद्यालयात, उच्च माध्यमिक व पदवीचे स्व. मारुतराव घुले पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले. देहरे सहकारी सेवा सोसायटीचे सचिव राजेंद्र खुंटाळे आणि अंगणवाडी सेविका मीनाक्षी खुंटाळे यांनी पोटाला चिमटा घेऊन ओंकारच्या शिक्षणासाठी रसद पुरवली. 2018 पासून ते पुण्यामध्ये युपीएससीचा अभ्यास करीत होते. तब्बल सात वर्षांनंतर सतत अभ्यास केल्याने त्यांना यश मिळाले. आत्मनिर्धार फाउंडेशनने बुधवारी सायंकाळी स्वागत मिरवणूक व नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील ज्ञानेश्वर मुखकेर अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले असून, त्यांच्या जिद्दीने, चिकाटीने आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने त्यांनी हे मोठे यश प्राप्त केले आहे.
ग्रामीण भागातून येणारे ज्ञानेश्वर मुखेकर यांनी कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षणाची वाटचाल करीत त्यांनी हा मोठा टप्पा गाठला. ज्ञानेश्वर यांचे वडील एक एकर शेत जमिनीत शेती करीत असून, शेतीत मोलमजुरीही करतात. त्यांच्या आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या एक बंधू खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत. अशा पार्श्वभूमीतून येऊनही ज्ञानेश्वर यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सध्या ज्ञानेश्वर मुखेकर हे पुणे येथे शासकीय सेवेत श्रेणी एक वर्गात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.