

मुदाळतिट्टा : कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गरम्य भागात वसलेल्या अवचितवाडी येथील उपराळा तलाव सोमवारी (दि.२३) पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून एक महिना अगोदरच तुडूंब भरून वाहत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने भरत असलेला हा तलाव यंदाही ३१.८४ मीटर उंचीवरून सांडव्यावरून वाहू लागला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर ६०० एकर शेती ओलिताखाली येणार आहे. या तलावाची उंची ३२ मीटर, भिंतीची लांबी ३०० मीटर, सांडवा लांबी ८३ मीटर आहे. तर पाणलोट क्षेत्र ५.३३ चौ. कि. मी., पाणीसाठा : ४९.८९ द.ल.घ.मी. बुडीत क्षेत्र ५१ एकर, तर लाभक्षेत्र ६०० एकर आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने चिमगाव, अवचितवाडी, ठाणेवाडी आणि आसपासच्या डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा आधार मिळणार आहे.
उपराळा तलावाचा परिसर हिरवळ, वाहणारे पाणी, शांतता आणि डोंगरांची कुशी या सर्व घटकांमुळे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरत आहे. सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक आणि तरुणांची या ठिकाणी मोठी गर्दी असते.