Kolhapur News |
शिरढोण : टाकवडे (ता.शिरोळ) येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुधवारी मध्यरात्रीच्या उभारल्याने पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त असून, शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. पुतळा ग्रामस्थ व युवकांनी काढून घ्यावा व प्रशासनाची परवानगी घेऊन बसवावा. यावर प्रशासन ठाम असताना पुतळा हटविण्यास गावातील ग्रामस्थ आणि युवकांचा विरोध असल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा स्थापित केला. ही माहिती सकाळी समजल्यानंतर शिरोळ पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासन दाखल झाले असून, गावात परिसरात तणावाचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले आहेत.
प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून संबधितावर गुन्हे दाखल करण्याचे सांगितल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पट्टण कोडोली (ता. हातकणंगले) गावाच्या धर्तीवर येथे विना परवाना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचा प्रकार घडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, पोलीस व महसूल प्रशासन सकाळी ६ वाजलेपासून या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पुतळा उभारणाऱ्यावर व याचे समर्थन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवप्रेमी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात बंद खोलीत चर्चा सुरू आहे.