

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने ते गुरुवारी (दि.15) होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात डोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनाम्याबाबत अद्याप काही चर्चा झाली नसली तरी नेत्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे सांगितले.
गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महोदवराव महाडिक यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन मंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांनी मोट बांधली. यावेळी गोकुळच्या निवडणुकीत प्रभाव टाकणारे आणि गोकुळमध्ये गेल्या तीन दशकापासून अधिक काळ संचालक असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना महादेवराव महाडिक गटातून फोडून आपल्यासोबत घेण्यात मुश्रीफ व पाटील यांना यश आले. त्यांना सोबत घेताना नेत्यांनी प्रत्येकी दोन वर्षे अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार प्रथम विश्वास पाटील यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यांची मुदत संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे अरुण डोंगळे यांना संधी देण्यात आली.
डोंगळे यांची दोन वर्षांची मुदत संपत आहे. अध्यक्षांना आपला राजीनामा कार्यकारी संचालकांना सादर करावा लागतो. कार्यकारी संचालक मंजुरीसाठी हा राजीनामा संचालक मंडळ बैठकीसमोर ठेवतात. संचालक मंडळात राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविला जातो. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. यामध्ये दहा ते बारा दिवसांचा कालावधी जातो.
गुरुवारी संचालक मंडळीची बैठक होत असल्याने डोंगळे आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. आता अध्यक्षपद आ. सतेज पाटील गटाला मिळणार आहे. या गटाकडून बाबासाहेब चौगुले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.