

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोणत्याही शहराचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षगणना आवश्यक आहे. एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता या प्रमाणात वृक्षांची संख्या ठरलेली असते. त्यातुलनेत वृक्ष असायला पाहिजेत. कोल्हापुरात अत्यंत दुर्मीळ आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. मात्र, महापालिकेच्या इतिहासात अद्याप एकदाही पूर्ण वृक्षगणना झालेली नाही. प्रशासनाची उदासीनता त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात वृक्ष किती आहेत? कोणत्या प्रजातीचे आहेत? याची माहिती उपलब्ध नाही. परिणामी, वृक्षसंपदा अफाट; पण गणना शून्य! अशी परिस्थिती आहे.
कोल्हापूर शहरात अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष अत्यंत दुर्मीळ आहेत. अशा वृक्षांचे कायमस्वरूपी संरक्षण करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्या वृक्षांना हेरिटेज दर्जा प्राप्त करून देणे गरजेचे आहे. शहरातील दुर्मीळ वृक्ष रस्त्यांच्या कडेने, महापालिकेच्या उद्यानांत, शासकीय व खासगी उद्यानांत, शैक्षणिक संस्थांच्या आवारात आहेत. त्याबरोबरच फुटपाथवरही काही वृक्ष आहेत.
वृक्षगणनेबद्दल 2005 मध्ये कायदा झाला. त्यानुसार साधारणतः दहा वर्षांतून एकदा वृक्षगणना होणे आवश्यक आहे. महापालिकेने 2014-15 मध्ये शहरातील वृक्षगणना करण्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका दिला. संबंधित कंपनीने शहरातील 81 प्रभागांपैकी फक्त 35 प्रभागांतच वृक्षगणना केली. त्यानुसार शहरात 4 लाख 66 हजार 344 वृक्ष असल्याची माहिती पुढे आली. यात 218 प्रकारची वृक्षसंपदा असल्याचा अहवाल कंपनीने महापालिकेला दिला. प्रत्येक झाडाची जीपीएस इमेज द्यायची होती. मात्र, कंपनीने ते केले नाही. पूर्ण शहराची वृक्षगणना न करताच कंपनीने गाशा गुंडाळला. आजही शहरातील वृक्षगणनेची माहिती मागितली, तर उद्यान विभागातील अधिकारी हीच माहिती देऊन हात झटकतात.
अतिदुर्मीळ असलेले वृक्ष
अमृतफळ, क्लाईनहॉविया, तिवर, पॅचिरा, फर्न ट्री, ब्राऊनिया, मोठा करमळ, लोणीफळ, वायवर्णा, सुकाणू, सुवर्णपर्णी, कैलासपती, क्नीसलँड नट, अजानवृक्ष, गोरखचिंच, सॉसेज ट्री, बकुळ, जारूळ, वावळ, ब्राझील नट, कॅनंगा, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, दिवी दिवी, बालमस ट्री, बेहडा, मुचकुंद, रतनगुंज, फकीर वाडगा, समुद्र फळ, सुरंगी, हनुमान फळ, उंडी, मदागास्कर मदाम, कळम, टेमरू, जंगली बदाम, विलायती बेल, पुत्रंजीवी, गुलाब जांभ.