

कासारवाडी / टोप : हातकणंगले तालुक्यातील टोप, कासारवाडी येथील खडी क्रेशर तपासणी करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन, व्यापारी परवाना नसलेले खडी क्रेशर हातकणंगले तहसीलदार यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत सील केले.
बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत टोप-कासारवाडी येथील दगड उत्खनन प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळायला पाहिजेत, हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी डोंगर रांगातील अनाधिकृत उत्खननाबाबत महसूल विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? असा सवालही उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महसूल विभागाच्या पथकाने टोप, कासारवाडी परिसरातील खडी क्रेशरची व्यापारी परवाना नसलेल्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण नियमानुसार यांचेकडील सद्यस्थितीमध्ये चालू प्रमाणपत्र नसलेले खडी क्रशरांची तपासणी केली यामध्ये ३७ क्रशर सील केल्या तर ९ क्रशरांचे परवाने असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई शिरोली मंडळ अधिकारी सीमा मोरये, पेठ वडगावचे मंडळ अधिकारी पांडुरंग धुमाळ, वाठारचे मंडळ अधिकारी अमित लाड, टोप ग्राम महसुल अधिकारी अमोल काटे, महसूल सेवक सचिन कांबळे , ग्राम महसुल अधिकारी उमेश माळी यांच्या पथकाने केली.
विधान परिषदेत उपस्थित केलेला प्रश्न हा खाणीच्या दगड उत्खननाशी संबंधित आहे. क्रेशर सील करण्याची कारवाई आमच्यासाठी अनपेक्षित आहे. व्यापारी परवाना हा उत्पादकांना लागू होत नाही. याबाबत अनेक वेळा निवेदने दिली आहेत. असे एका क्रशर मालकाने सांगितले आहे.