

कोल्हापूर : जेवणाचे आणि दारूचे बिल कमी करण्याच्या कारणावरून सादळे-मादळे येथील चैतन्य रिसॉर्टमध्ये मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास राडा झाला. हॉकी स्टीक, लाठीकाठी, चाकू व तलवारीसारख्या घातक हत्यारांसह आलेल्या 15 जणांच्या टोळक्याने रिसॉर्टमध्ये घुसून तोडफोड करत कर्मचार्यांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
इचलकरंजी आणि यड्राव येथील काही युवक मंगळवारी सायंकाळी रिसॉर्टमध्ये आले होते. जेवण आणि मद्यपानानंतर बिलात सवलत देण्यावरून त्यांचा कर्मचार्यांशी वाद झाला. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर हे युवक तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत निघून गेले. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन रिसॉर्टवर सशस्त्र हल्ला केला. त्यांनी रिसॉर्टमधील साहित्याची तोडफोड करत दिसेल त्याला मारहाण केली. या हल्ल्यात वैभव भोसले आणि सुभाष माळी या दोन कर्मचार्यांचे अपहरण करून त्यांना गाडीत घालून बेदम मारहाण केली आणि पहाटे कासारवाडी फाट्यावर फेकून दिले. शिरोली पोलिसांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
जेवणाचे आणि दारूचे बिल कमी करण्यास नकार दिल्याने वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीत कर्मचार्यांनी युवकांना मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी हे युवक रात्री उशिरा आपल्या मित्रांसह परतले आणि त्यांनी घातक हत्यारांनी हल्ला चढवला. यानंतर दोन कर्मचार्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.