

Adamapur Balumama 60th Punyatithi Utsav
मुदाळतिट्टा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरू बाळूमामांचा ६० वा पुण्यतिथी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करत मंदिराभोवती दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम महासप्ताहात तब्बल ५५० वाचकांनी सहभाग नोंदवला. सप्ताहादरम्यान ज्ञानेश्वरी, बाळूमामा विजय ग्रंथ, हरिपाठ, संगीत भजन, समाधी पूजन, काकड आरती, ‘राम कृष्ण हरी’ जप, गाथा भजन आणि हरिपाठ आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बाळूमामांच्या समाधी आणि मूर्तीची आठही दिवस विविध फुले व फळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या नेत्रदीपक आरासीने मंदिर परिसराचे भक्तिमय सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.
सप्ताहादरम्यान पूर्णानंद काजवे (कोगनोळी), नारायण एकल (जोगेवाडी), अशोकराव कौलवकर (गारगोटी), भानुदास कोल्हापुरे (ईश्वरपूर), बाबुराव पाटील (सावर्डे), योगेश जाधव (देवाची आळंदी) आणि इंद्रजीत देशमुख (माहूली) यांनी प्रवचन सेवा बजावली. तसेच चैतन्य महाराज निंबोळे (नाशिककर), श्री गुरु कान्होबा महाराज देहूकर (डोंबिवली), चारुदत्त आफळे (पुणे), यशोधन साखरे (आळंदी), जगन्नाथ पाटील (मुंबई) आणि ज्ञानेश्वर कदम (देवाची आळंदी) यांची कीर्तन सेवा झाली.
मंगळवारी सकाळी उदयशास्त्री सेकिनहासूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर मंदिराभोवती भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. या वेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामांच्या जयघोषात उत्सवाचा आनंद घेतला.
सप्ताहादरम्यान हनीमनाळ, बहिरापूर, मतीवडे, कूर, कासारवाडा, सोनाली, हिडदुगी, शेंद्री, मनुचीवाडी, शिंदेवाडी, यमगे, बेलेवाडी, निळपण, बोरवडे, नौकूड, सरवडे, मुरगूड, हळदी, गारगोटी, वाघापूर, मुदाळ आणि निगवे खालसा आदी गावांतील भजनी मंडळांनी हरिजागर केला.
पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध गावांतील भक्तांच्या पायी दिंड्या आदमापूर येथे दाखल झाल्या. भक्तांनी बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत पुण्यतिथी उत्सवाचा भक्तिमय अनुभव घेतला.
यावेळी देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामानंद मरेगुद्री, सर्व विश्वस्त, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.