

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा देवालय ट्रस्टमधील ६० कोटी ७५ लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. यामध्ये पाच अधिकार्यांसह आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे तपासाला गती येणार असल्याची महिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा, पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह दोन पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सहधर्मादाय आयुक्तही या विशेष तपास पथकासोबत काम करणार आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत मेंढ्यांची विक्री व जमीन खरेदीत अनियमितता असल्याचा ट्रस्टवर ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिणी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह कंत्राटदार आणि संबंधितांवर ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
देणगीचेही रेकॉर्ड तपासणार
देवस्थानला शिधा, वर्गणी, खोबरेल तेल निर्मिती, बकऱ्यांची विक्री यातून उत्पन्न मिळते. देवस्थानच्या विविध उत्पन्नाच्या मार्गांचा तपास सुरू आहे. देवस्थान जमिनीच्या खरेदी - विक्रीमध्येही अनियमितता आहे काय हेही तपासण्यात येणार आहे.
विश्वस्तांची धर्मादायकडे हजेरी
आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत देवस्थान समितीच्या विश्वस्तांंची चौकशी केली आहे. देवस्थानचे दप्तर ताब्यात घेऊन व्यवहारांची पडताळणी सुरू केली आहे. या घोटाळ्यामध्ये आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.