

The 'Ukhalu Waterfall' started flowing in May
बांबवडे : पुढारी वृत्तसेवा
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या चांदोलीधरणाच्या समकक्ष सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले उखळू येथील धबधबा चालू वर्षा मे महिन्यातच कोसळू लागला आहे, गेल्या ५० वर्षात असे कधीच झाले नाही ते या वर्षी झाले असून पर्यटकांना एक पर्वणीच प्राप्त झाली आहे.
मान्सून पूर्व पावसाने गेल्या दहा दिवसांपासून शाहूवाडी तालुक्यात चांगलाच जोर धरला आहे. शाहूवाडीच्या उत्तर भागातील कानसा-वारणा खोऱ्यात तर पावसाचा आगरच असतो. चालू वर्षी पावसाने अनेक वर्षांची आकडेवारी मोडीत काढली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी जून महिन्यात प्रवाहित होणारे पाण्याचे प्रवाह मे महिन्यातच सुरू झाले आहेत.
सध्या तालुक्यात पाऊस कोसळत आहे. अशा वातावरणात चांदोली धरण परिसरातील शाहूवाडी तालुक्यात निसर्गसौदर्यात भर घालणारा उखळू येथील धबधबा मे महिन्यातच कोसळू लागला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागेत असणारा हा नयणरम्य धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना एक नवी संधी प्राप्त झाली आहे.
साधारण २५० ते ३०० फूटांवरून हा धबधबा कोसळत असतो. प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून पुढचे चार महिने या भागात पर्यटकांचा ओग असतो, या ठिकाणी शाहूवाडी शिराळा, इस्लामपूर, कराड या भागातून हौशी पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात.