

कोल्हापूर : दूषित पाण्यामुळे होणार्या जलजन्य आजारांचे संकट गंभीर बनले आहे. त्यातच परतीच्या पावसाने राज्यातील पाण्याचे साठे दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने राज्यात गॅस्ट्रो, डायरिया, संसर्गजन्य कावीळ, टायफॉईडसारख्या जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना जलजन्य आजारांची लागण झाली आहे, तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 10 लाख 70 हजार 761 रुग्ण हे अतिसारचे असून, 1 लाख 49 हजार 978 रुग्ण गॅस्ट्रो, संसर्गजन्य, कावीळ, टायफॉईड, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिसचे आहेत.
दूषित पाणी व त्याद्वारे बनविलेल्या अन्नपदार्थांमुळे जलजन्य आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे. डायरिया अर्थात अतिसार हा त्यापैकीच एक. जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास शरीरातील पाणी कमी होते. यामुळे डीहाड्रेशन होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत अतिसाराच्या प्रादुर्भाव आहे.
दूषित पाणी पिल्याने, उघड्यावरील, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने जलजन्य आजारांचा धोका असतो. गेल्या वर्षभरातील जलजन्य आजारांचे प्रमाण धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात 3 लाख 25 हजार 927 जणांना अतिसारची लागण झाली आहे. 38 हजार 614 जणांना विषमज्वर (टाईफॉईड), 27 हजार 757 जणांना गॅस्ट्रो, 1 हजार 484 जणांना लेप्टोस्पायरोसिस तर 22 जणांना कॉलराची लागण झाली आहे. गंभीरबाब म्हणजे वर्षभरात 8 जणांचा लेप्टोस्पायरोसिसमुळे तर एकाचा कॉलरामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या ऐन हिवाळ्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. कमी वेळत मोठा पाऊस होत असल्याने नाले ओसंडून वाहू लागले आहेत. परिणामी, सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे पावसाळा संपला, तरी जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे.