गुणवंतांचा टक्का वाढला; मुलीच हुशार

गुणवंतांचा टक्का वाढला; मुलीच हुशार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलीच हुशार ठरल्या आहेत. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला. कोल्हापूर विभागाचा निकाल 94.24 टक्के लागला आहे. यंदा निकालात एक टक्क्याने वाढ झाली. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.01 टक्के असून, हे प्रमाण मुलांपेक्षा 5.23 टक्क्यांनी जास्त आहे. विभागात कोल्हापूर जिल्हा 95.66 टक्केवारीसह अव्वल आहे. राज्यात कोल्हापूर विभाग यावर्षी चौथ्या स्थानी असून, गतवर्षी तृतीय क्रमांकावर होता, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या 861 कनिष्ठ महाविद्यालयांतून 175 परीक्षा केंद्रांवर 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा झाली. कोल्हापूर विभागातून
1 लाख 14 हजार 319 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 7 हजार 741 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 94.24 टक्के आहे. मुला-मुलींच्या निकालाची तुलना करता यावर्षी 60 हजार 538 मुले परीक्षेला बसली. त्यामधून 55 हजार 566 उत्तीर्ण झाली. उत्तीर्णतेचे प्रमाण 91.78 टक्के आहे. 53 हजार 781 मुली परीक्षेला बसल्या. पैकी 52 हजार 175 उत्तीर्ण झाल्या असून, टक्केवारी 97.01 आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 49 हजार 210 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 47 हजार 76 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 95.66 आहे. सांगलीतून 31 हजार 320 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 29 हजार 28 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 92.68 आहे. सातारा जिल्ह्यातून 33 हजार 789 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी 31 हजार 637 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 93.63 आहे.

कोल्हापूर विभागातून 2,651 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,601 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून 1,354 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 52.05 आहे. बारावीच्या परीक्षेत यावेळेस कोल्हापूर विभागात 11 गैरमार्ग प्रकरणे आढळून आली. चौकशीअंती दोषी आढळल्याने 11 विद्यार्थ्यांची फेब्रुवारी-मार्च 2024 मधील त्यांनी केलेल्या गैरमार्ग विषयाची संपादणूक रद्द करण्यात आल्याची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाईन निकालानंतर गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी http:/// verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर नियम, अटी दिल्या आहेत. गुण पडताळणीची मुदत 22 मे ते 5 जूनपर्यंत असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेल, हस्तपोच, रजिस्टर पोस्ट यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना वापरता येईल. यासाठी 22 मे ते 5 जूनदरम्यान विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे गरजेचे आहे. छायाप्रत मिळाल्यापासून त्या पुढील पाच दिवसांच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकन पद्धत वापरून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांच्या वाटपाबाबत लवकरच विभागीय मंडळातर्फे कळविण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव चौगुले यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड, विभागीय सहसचिव डी. एस. पोवार यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, बोर्डातील अधिकारी उपस्थित होते.

लवकरच दहावी, बारावीसाठी सेमिस्टर पद्धत

राज्य सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठ, महाविद्यालयस्तरावर सुरू केली आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयांत याची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना शासनस्तरावरून नाहीत. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यावर दहावी, बारावीसाठी सेमिस्टर पद्धत लागू होणार असल्याचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news