नृसिंहवाडी: पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुराकडे शासनाने यावर्षी दुर्लक्ष केले आहे. याचा निषेध करण्यासाठी अंकुश संघटनेच्या वतीने गुरूवारी (दि. १) शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीतील कृष्णा नदीत बसून अभिनव आंदोलन छेडणार आहेत. कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांची आज (दि.३०) 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.
ते म्हणाले की, २००५ पासून आलेले सर्व महापूर हे सरकारी अनास्थेमुळेच आले आहेत. कर्नाटक शासनाला पाण्याचा अति हव्यास तसेच महाराष्ट्रातील मंत्री, अधिकारी वर्गाची अनास्था कारणीभूत ठरली आहे. कोल्हापूर, सांगलीतील महापूराबाबत कर्नाटक शासनाला केंद्रीय जल आयोगाचे निकष पाळणे बंधनकारक करावे.
मागील चार महापुराचा अनुभव असताना राज्य सरकारने संभाव्य महापुराच्या धोक्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, असा आरोप करून चुडमुंगे पुढे म्हणाले की, वास्तविक पाहता जुलै अखेर धरणात ५० टक्के पाणी साठवणे बंधनकारक असताना हा निकष धाब्यावर बसवला आहे. हिप्परगी धरण वजा बंधारा मांजरी पुलाचा भराव महापुराला कारणीभूत आहे. पूर्वी महापूर यायचे व लवकर पाणी उतरायचे, अशी परिस्थिती पूर्वी होती. ती आता पूर्णपणे बदलली आहे.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात होणारे आंदोलन तीव्र असेल व याची सर्व जबाबदारी शासनावर असेल. आमच्या सहनशीलतेची मर्यादा आता संपली आहे. महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, १ ऑगस्टरोजी सांगली महापूर नियंत्रण समिती यांच्यावतीने सांगली येथे अशाच प्रकारचे आंदोलन छेडण्यात येणार आहे.