कोल्हापूर : जिल्ह्यातील महामार्गासह विविध ठिकाणी असलेल्या ब्लॅक स्पॉट आणि अपघातप्रवण क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने 34 कोटी 67 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव वर्षभर मंत्रालयात धूळ खात पडून आहे. नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या प्रस्तावाकडे लक्ष देण्यास संबंधितांना वेळ नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी रस्ता सुरक्षा समितीसह आरटीओ, पोलिस विभाग प्रयत्नशील असतात. याचाच भाग म्हणून जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीमार्फत सर्वेक्षण करून अपघातप्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट निश्चित केले जातात. ब्लॅक स्पॉट निश्चितीनंतर त्यावर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातात. यंदाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 17 ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. यामध्ये तब्बल 15 ब्लॅक स्पॉट राष्ट्रीय महामार्गावर व एक राज्यमार्गावर, तर एक इतर मार्गावर आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी 123 अपघातप्रवण क्षेत्र आहेत.
राज्य रस्ता सुरक्षा समितीने असे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजनांसाठी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव मागविले होते. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट आणि अपघातप्रवण क्षेत्रांत दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य रस्ता सुरक्षा समितीच्या निधीतून 34 कोटी 67 लाख रुपयांचा प्रस्ताव जानेवारीमध्ये पाठविला आहे. प्रस्ताव पाठवून सहा महिने उलटले, तरी याबाबत अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. या निधीतून जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटबावत उपाययोजनांमध्ये पूल बांधणे, सेवा मार्गांचा विस्तार करणे, रस्ता दुभाजक करणे, प्रबोधन आणि माहिती फलक लावणे आदींसह विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.