

Black Day Emergency reporting Daily Pudhari
कोल्हापूर : अनुराधा कदम
आणीबाणीच्या दुसर्याच दिवशी, 27 जून 1975 रोजीच्या दैनिक ‘पुढारी’च्या अंकात या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वांगीण वार्तांकन करण्यात आले होते. या निर्णयाचा उद्देश, परिणाम, देशात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी यामागे राजकीय अस्थैर्य, विरोधकांची उग्र आंदोलने आणि इंदिरा गांधींवरील निवडणूक निकालावरचा न्यायालयीन वाद या पार्श्वभूमीचा ठळक प्रभाव त्या दिवशीच्या वृत्तांतात दिसून येतो. या घटनेचे तत्कालिक आणि व्यापक प्रभाव लक्षात घेता अत्यंत सर्वंकष, स्पष्ट आणि गंभीर वार्तांकन दैनिक ‘पुढारी’ने केले होते.
अग्रलेखातून नागरिकांचे स्वातंत्र्य, विरोधकांचे हक्क आणि माध्यमांच्या मोकळेपणावर काय परिणाम होतील, याचा सावधपणे वेध घेतला गेला. मुख्य पानावरील प्रमुख बातमीत राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम 352 अंतर्गत आणीबाणी घोषित केल्याची माहिती, तिची कायदेशीर बाजू, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडिओवरून केलेल्या भाषणाचे ठळक मुद्दे सविस्तरपणे प्रसिद्ध करण्यात आले होते.
आणीबाणीच्या पहिल्या दिवशीच देशभरात अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत शेकडो विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. याबाबत राज्यनिहाय आकडेवारीचा सविस्तर तपशील ‘पुढारी’ने दिला होता. विशेष म्हणजे, काँग्रेस सरकार असलेल्या कोणत्याही राज्यात एकाही नेत्याला अटक करण्यात आलेली नव्हती. हा मुद्दा ‘पुढारी’ने अचूकपणे अधोरेखित केला.
देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेताना दै. ‘पुढारी’ने बातम्यांमधून घेतला होता. गुजरातमध्ये जाळपोळ, हरियाणात संप, मुंबई व पुण्यात मोर्चे आणि दगडफेकीच्या घटना, केरळमध्ये निदर्शनांची माहिती दिली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बंद यशस्वी झाल्याचे सांगत, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. अटक केलेल्या विरोधी नेत्यांचे नावे छापलेल्या तसेच निषेध म्हणून रकाने कोरे ठेवलेल्या वृत्तपत्रांची त्यांनी गंभीर दखल घेण्याचा इशारा दिला होता. याचाही उल्लेख वार्तांकनात आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी आणि सरकाराविरोधातील आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आणीबाणी जाहीर करावी लागल्याचे सांगितले. आणीबाणी संदर्भातील इंदिरा गांधी यांनी केलेली विधाने, कारणे, भूमिका याविषयीची मांडणी हा त्यादिवशीच्या अंकातील तटस्थ वार्तांकनाचा गाभा होता.
या निर्णयासोबतच इंदिरा गांधींनी मूलगामी आर्थिक धोरणांची घोषणाही केली. यासंबंधी स्वतंत्र बातमी ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे घेतलेला हा निर्णय संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर गदा आणणारा असल्याचे सूचकपणे ‘पुढारी’ने मांडले.
आणीबाणी जाहीर झालेल्या दिवशी कोल्हापुरात शस्त्रबंदी व जमावबंदी जाहीर केल्याचे वृत्त ‘पुढारी’च्या अंकात आहे. 6 जुलैपर्यंत हा निर्णय लागू असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच कोल्हापूर झोपडपट्टी संघटनेच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला व आणीबाणी निर्णयाला पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्तही ‘पुढारी’च्या स्थानिक अंकात आहे. आणीबाणीबाबत ‘दैनिक पुढारी’च्या वार्तांकनातून त्या काळातील सामाजिक-राजकीय घडामोडींचा आरसा दिसून येतो. 50 वर्षांनंतर या पानांकडे पाहताना भारतीय लोकशाहीचा तो काळा अध्याय अधिक स्पष्ट आणि विश्लेषक ठरतो.