कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेने शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा द्यावा, हा प्रस्ताव फेटाळत शिवसेनेने सरूडकरांच्या हाती मशाल सोपविली आहे. खा. धैर्यशील माने व राजू शेट्टींसमोर आता वंंचित बहुजन आघाडीबरोबर आणखी ठाकरे शिवसेनेचे एक आव्हान उभे राहिले आहे. हातकणंगलेत चौरंगी लढतीत आता मतदार कुणाला कौल देणार, हे औत्सुक्याचे आहे.
महाविकास आघाडीत कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ ठाकरे शिवसेनेकडे आहेत. कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. हातकणंगलेत राजू शेट्टी यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. त्यांनी दोनवेळा उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या राज्यपातळीवरील नेत्यांचा शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्यास विरोध होता, तर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना स्थानिक राजकारणात शेट्टी हवे होते. मात्र, शिवसेनेने शेवटी शेट्टी यांच्यासमोर मशाल चिन्हावर लढण्याचा पर्याय ठेवला. तो शेट्टी यांनी अमान्य केला.
येथून सत्यजित पाटील- सरूडकर यांच्याबरोबरच माजी आमदार सुजित मिणचेकरही इच्छुक होते, तर पक्षाने माजी आमदार उल्हास पाटील यांनाही तयार राहण्यास सांगितले होते. अखेर सत्यजित पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
सत्यजित पाटील हे दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर शाहूवाडीतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पाटील हेही या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
आपल्याला मिळालेली उमेदवारी हे निष्ठेचे फळ असून, या संधीचे आपण सोने करू, अशा भावना सत्यजित पाटील-सरूडकर यांनी व्यक्त केल्या. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी दाखविलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू. आमदार जयंत पाटील, मानसिंग नाईक, सतेज पाटील व राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व उल्हास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसमवेत आपण मतदारसंघावर आघाडीचे मेळावे घेणार आहोत, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे मशाल चिन्ह घेण्याबाबत आपण राजू शेट्टी यांना सांगितले होते; पण त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही.
– संजय राऊत, शिवसेना नेते30 वर्षे शेतकरी चळवळीत काम करतोय, अचानक मशाल हाती घेण्याचा प्रस्ताव कसा काय स्वीकारणार? – राजू शेट्टी