

कोल्हापूर, आशिष शिंदे : कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी निविदा (टेंडर) तयार आहे. आयटी असोसिएशन व महापालिका यांच्यातील दराच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून उभयमान्य तोडगा निघताच आयटी पार्क साकारणार आहे. त्यासाठी महापालिका आणि आयटी असोसिएशन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच एक संयुक्त बैठक होणार आहे.
स्थानिक कंपन्या आणि महापालिकेच्या वतीने कोल्हापुरात आयटी पार्क स्थापन्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येणार आहे. टेंबलाईवाडीतील तीन एकरवर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यासाठी 15 हजार 120 चौरस मीटरचे क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'पीपीपी' तत्त्वावर ही इमारत दिली जाणार आहे. आयटी पार्कसाठी राखीव असलेल्या जागेत अन्य सुविधा देण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. या आयटी पार्कमुळे स्थानिक पातळीवर रोजगार संधी मिळून कोल्हापूरच्या प्रगतीला हातभार लागणार आहे.
आयटी पार्कसाठी जागा निश्चिती झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने केपीएमजी कंपनी व आयटी असोसिएशनची बैठक झाली. यावेळी जागेच्या दराबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
350 हून नोंदणीकृत आयटी कंपन्या
कोल्हापूरमध्ये 350 हून अधिक नोंदणीकृत आयटी कंपन्या आहेत. यामध्ये 50 कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी काम करत आहेत. सध्या 8 ते 10 हजार जणांना या कपन्यांमुळे रोजगार मिळाला आहे. आयटी पार्क सुरू झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.