

Bhudargad Temple Theft
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील निष्णप येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी व काळम्मा देवीच्या मंदिरांची कुलपे फोडून सुमारे चार लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला. विशेष म्हणजे चोरट्यांनी देवींचे सोन्याचे डोळेही काढून नेल्याने भाविकांच्या भावना तीव्र दुखावल्या असून, संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यात गेल्या महिन्याभरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता देवस्थानांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. निष्णप येथील महालक्ष्मी मंदिर हे जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सायंकाळी पुजारी अरविंद वसंत गुरव यांनी कुलूप लावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडताच कुलूप तोडलेले, देवीचे दागिने गायब आणि देवीचे सोन्याचे डोळे काढून नेल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी देवीच्या डोळ्यांतील सोन्याचे दागिने, गळ्यातील मंगळसूत्र, दोन चांदीच्या पादुका तसेच सुमारे एक किलो वजनाची चांदीची छत्री असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच रात्री गावातील काळम्मा देवीच्या मंदिरालाही लक्ष्य करून सोन्याचे डोळे, मंगळसूत्र व चांदीचे पैंजण असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दोन मंदिरांतील सलग चोरी ही पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चोरट्यांची मजल देवतांचे डोळे काढून नेण्याइतकी गेली आहे. चोरी होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे सापडले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या प्रकरणी पुजारी अरविंद वसंत गुरव यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र केवळ तपासाचे औपचारिक सोपस्कार नकोत, तर चोरट्यांचा तात्काळ छडा लावावा, देवस्थान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे.