

Kagal Murgud road tempo bike collision
सिद्धनेर्ली: कागल - मुरगुड रस्त्यावरील पिंपळगाव खुर्द येथील आवटे मळा परिसरात धान्याने भरलेला टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. दुचाकीचे पुढचे चाक तुटून दूर फेकले गेले. यात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी १० च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंटू कृष्णा सरगर (वय ४२, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) हे आपला आयशर ट्रक ( MH 11 AL 2172) घेऊन कागल MIDC शासकीय गोदामातून गहू आणि तांदूळ भरून व्हनाळी येथील रेशन दुकानात पोहोचवण्यासाठी जात होते. आज सकाळी १० च्या सुमारास ते आवटे-पाटील यांच्या शेताजवळ आले असता, समोरून येणाऱ्या मोटारसायकलने ( MH 09 GQ 7197) ट्रकला जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार अंबू विठ्ठल फोंडे (वय २४) आणि दीपक इंजू जंगले (वय २१, दोन्ही रा. पिंपळगाव, ता. कागल) हे दोघेही गंभीर जखमी झाले. एक तरुण रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने त्याच्या हात-पायाला गंभीर दुखापत झाली, तर दुसरा तरुण रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व ट्रकवरील हमालांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या धडकेत ट्रकचे आणि मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.