जनता दलाचे अस्तित्व कायम ठेवून यापुढे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल

जनता दलाचे अस्तित्व कायम ठेवून यापुढे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जनता दलाचे अस्तित्व कायम ठेवत जिल्ह्यात आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असल्याची घोषणा जनता दलाच्या स्वाती कोरी यांनी गडहिंग्लज चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी अजिंक्यतारा कार्यालयात आ. सतेज पाटील यांची भेट घेऊन केली. यावेळी आ. पाटील यांनी, श्रीपतराव शिंदे यांची उणीव कार्यकर्त्यांना भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते.

आतापर्यंत आमच्याशी प्रत्येकाने स्वार्थी राजकारण केल्यामुळे आमच्या पदरात काही पडले नाही. अनेक पक्षांकडून आम्हाला ऑफर आली होती. परंतु जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व असलेले सतेज पाटील यांनी आम्हाला वडिलांसारखे स्वीकारून बळ देण्याचा शब्द दिल्यामुळे त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारत आहे. यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढील सर्व निवडणुकांमध्ये काम करणार असल्याचे स्वाती कोरी यांनी सांगितले. आ. पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत असताना जनता दलाचे अस्तित्व कायम ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. बहुमतासाठी 225 ते 250 खासदार पुरेसे आहेत, परंतु घटना बदलावयाची झाल्यास तीन चतुर्थांश संख्याबळ लागते. त्यामुळेच भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. भाजपचे हे संकट थोपवण्यासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.

स्वाती कोरी यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगून सर्वांनी शाहू महाराज यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे यांनी केले.

यावेळी बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टी, शरद पाडळकर, विनोद मुसळे, काशिनाथ देवगोंडा, दत्ता मगदूम, अ‍ॅड. विकास खोराटे, अकबर मुल्ला, दत्तात्रय मगदूम, बंटी कोरी, हिंदुराव नवकुडकर, अर्जुन पाटील, श्रीरंग चौगले, सचिन शिंदे, प्रणव शिंदे, प्रियंका यादव, सागर पाटील यांनी मनोगतामध्ये जनता दलाला पदरात घ्यावे, असे भावनिक आवाहन केले . जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आभार मानले.

पोरकं आणि परकं वाटू देणार नाही : पाटील

लोकसभेपुरते नव्हे तर यापुढे सर्व निडणुकांमध्ये आपण हातात हात घालून एकत्र वाटचाल करूया. बहिणीला कधीही काही कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात असलेल्या तुमच्या ताकदीचा उपयोग सर्वच निवडणुकांमध्ये होईल. तुम्हाला कधीही पोरकं आणि परकं वाटू दिलं जाणार नाही, असे. आ. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news