बोलोली : करवीर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून स्वयंभूवाडी (ता. करवीर) ते थेट पंढरपूर अशी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक एकादशीला स्वयंभूवाडी येथून सकाळी ८ वाजता ही बस सुटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या करवीर तालुक्यातून अनेक भाविक प्रत्येक एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जातात. यापूर्वी ज्येष्ठ वारकऱ्यांना कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन बस पकडावी लागत होती. मात्र आता त्यांच्या सोयीसाठी स्वयंभूवाडीहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी बोलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच शारदा बाटे, तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल बाटे व श्रीपती कांबळे यांनी एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, ही सेवा अखेर सुरू झाली आहे.
स्वयंभूवाडीहून सकाळी ८ वाजता बस निघणार असून, त्याचा थेट फायदा तालुक्यातील शेकडो भाविकांना होणार आहे. गुरूवार ८ मे पासून ही विशेष बससेवा सुरू झाली आहे. सरकारच्या विविध योजना जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, तसेच महिला सन्मान योजना अंतर्गत महिला प्रवाशांना तिकिट दरात सवलत याही या बस सेवेवर लागू असणार आहेत.