Swabhimani Shetkari Sanghatana | ऊस दरासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक

कुरुंदवाडमध्ये साखरेचा ट्रक अडविला
Swabhimani Shetkari Sanghatana  |
कुरुंदवाड : येथे कर्नाटकातून आलेला साखरेचा ट्रक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविला.
Published on: 
Updated on: 

शिरढोण : गत हंगामातील उसाला वाढीव दर मिळावा, अन्यथा कारखान्यांतून साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा देऊनही साखरेची वाहतूक सुरूच असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी कुरुंदवाड येथे साखरेचा ट्रक अडविला. घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ट्रक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

साखरेला मिळत असलेल्या उच्चांकी दराच्या पार्श्वभूमीवर गत हंगामातील उसाला वाढीव दर द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. दसरा संपून दिवाळी आली, तरी अंतिम वाढीव दर मिळाला नसल्याने संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी एका साखर कारखान्यातील साखर घेऊन ट्रक कुरुंदवाडमार्गे मिरजेकडे जात होता. याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी शिरढोण फाट्यावर ट्रक अडविला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, अकिवाटचे माजी सरपंच विशाल चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. आंदोलनात विक्रम पाटील, बंडू उमडाळे, पप्पू मालगावे, शिवाजी रोडे आदी सहभागी झाले होते.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर द्या संपतराव पवार यांची मागणी

कोल्‍हापूर : गळीत हंगामात २०२६-२७ मध्‍ये उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी (दि.२९) निवेदन देणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळच येऊ नये, अशी भक्कम आर्थिक व्यवस्था सरकारने उभी करावी. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, खासगी उपसा सिंचन पंपांची वीजदरवाढ माफ करावी व स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी. पत्रकार परिषदेला बाबुराव कदम, केरबा पाटील, शामराव मुळीक, अक्षय पवार-पाटील आदी उपस्‍थित होते.

गोरंबेत ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक रोखली

गोरंबे : ऊस दराचा तिढा कायम असताना कर्नाटक राज्यातील मत्तिवडे येथील काही शेतकर्‍यांनी आपला ऊस केनवडे येथील अन्नपूर्णा शुगर या कारखान्यास पाठवला होता. सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात येताच कार्यकर्त्यांनी एकत्र येत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवून जोपर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत ऊसतोड चालू केली जाणार नाही, असा पवित्रा घेत कर्नाटकातून आलेले चार ट्रॅक्टर गोरंबे हद्दीत अडवले. यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पांडुरंग चौगुले, पांडुरंग अडसूळ, रावसाहेब मुर्तुंडे, विजय खोत, एकनाथ पाटील, सुधीर पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news