‘सुळकूड’चे पाणी इचलकरंजीला दिले तर रक्तपात होईल : हसन मुश्रीफ

‘सुळकूड’चे पाणी इचलकरंजीला दिले तर रक्तपात होईल : हसन मुश्रीफ

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही परिस्थितीत, काहीही झाले तरी सुळकूड योजनेतून दूधगंगेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही. अन्यथा संघर्ष होईल, रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने संबंधित आजी-माजी आमदार, खासदारांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. यानंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.

इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र, या योजनेला कागल, करवीर आणि शिरोळ तालुक्यांतूनही विरोध होत आहे. काहीही झाले तरी दूधगंगेतूनच पाणी घेणार, असा निर्धार इचलकरंजीवासीयांनी केला आहे. काहीही झाले तरी पाण्याचा एकही थेंब देणार नाही, असा निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीनेही केला आहे. यातून दिवसेंदिवस संघर्ष वाढत आहे.

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीला कागल, करवीर आणि शिरोळ तालुक्यांतील लोकप्रतिनिधींसह दूधगंगा काठावरील निपाणी परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांनी भावना व्यक्त करताना सुळकूड योजना रद्द करण्यास भाग पाडू, असा निर्धार केला. दूधगंगेतूनच पाणी घेऊ, असा अट्टहास इचलकरंजीवासीय करत आहेत. पण त्यातून संघर्ष होईल, प्रसंगी रक्तपातही होईल. असे झाले तरी पाणी देणार नाही, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीसाठी आतापर्यंत तीन योजना झाल्या. तरीही इचलकरंजीकर दूधगंगेतूनच पाणी घेणार म्हणत आहेत. मात्र, आम्ही पाणी देणार नाही. मजरे येथून इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होईल. यामुळे सुळकूड योजनेसाठी मंजूर केेलेला निधी मजरेसाठी वापरावा.

काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळून लवकरच काम सुरू होईल. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, सुळकूड योजनेला आपला विरोधच आहे. राज्य शासनाने घाईगडबडीत ही योजना मंजूर केली आहे. या योजनेबाबत वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली जाईल. याकरिता मंत्री मुश्रीफ, आपण स्वत:, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर असे सोमवार किंवा मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकवाल्यांनो, तलवारी घेऊन या

सुळकूड धरणाच्या खाली कर्नाटक हद्दीत आम्ही ही योजना करतोय असे इचलकरंजीकर म्हणतात, त्या धरणाच्या खाली पाणी कुठले आहे? तिथे काय उमाळे लागलेत काय? पाणी आमचेच देणार. मग तुमच्या वाट्याचे चार टीएमसी पाणी आहे ते उचलणार, म्हणून तुम्ही कर्नाटकवाल्यांनोसुद्धा तलवारी घेऊन आले पाहिजे, असे विधान माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. इचलकरंजीवासीयांना पाणी कमी आहे, पाण्याची गरज आहे, शहर वाढलेय हे सगळे खरे आहे. मग वारणेवरील योजना रद्द का केली? तुम्ही का रद्द करू दिल्या? कृष्णेवरील योजना का सुरू ठेवली नाही? असा सवालही पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news