Sugarcane Agitation : ३० तास उलटले तरी तोडगा नाही; ऊस आंदोलनाची धग वाढली : 'किणी'पाठोपाठ आता पर्यायी मार्गही रोखले

किणी टोलनाक्यावरील चक्काजाम आंदोलनाचा दुसरा दिवस; बलवडीतही वाहतूक बंद, ४,५०० रुपये पहिली उचल मिळेपर्यंत हटणार नाही : राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा, ठाकरे गटाचाही पाठिंबा
Sugarcane Agitation : ३० तास उलटले तरी तोडगा नाही; ऊस आंदोलनाची धग वाढली : 'किणी'पाठोपाठ आता पर्यायी मार्गही रोखले
Published on: 
Updated on: 

पेठवडगाव : उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचा दुसरा दिवसही तोडग्याविनाच सुरू आहे. तीस तासांहून अधिक काळ उलटूनही प्रशासन किंवा साखर कारखानदारांकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे. दरम्यान, आंदोलकांनी रात्र महामार्गावरच काढली. शिवसेना ठाकरे गटही आज आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळाल्याशिवाय महामार्गावरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. अंथरूण-पांघरूण घेऊन हजारो शेतकऱ्यांनी टोलनाका परिसरातच रात्री मुक्काम केला. सकाळी पुन्हा घोषणाबाजी आणि भाषणांनी आंदोलनाला सुरुवात झाली.

पर्यायी मार्गही रोखल्याने प्रवाशांची कोंडी

किणी टोलनाक्यावरील चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली होती. मात्र, आता या मार्गांवरील वाहतूकही रोखण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील बलवडी येथेही शेतकऱ्यांनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवास करणारे व गावाकडे परतणारे नागरिक रस्त्यात अडकले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ऊसदराचा प्रश्न तातडीने सोडवून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

आंदोलनस्थळी मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांच्या भोजनासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. सुमारे एक लाख पत्रावळ्या, डाळ-तांदळाची शेकडो पोती, तेलाचे डबे आणि भाजीपाला जमा झाला आहे. किणी, घुणकी, भादोलेसह परिसरातील गावांतून चपाती व भाकरी आणून दिल्या जात आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि उपनेते अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, रवी निंबाळकर, संदीप दबडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक आंदोलनस्थळी उपस्थित होते. प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने व गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, राजेंद्र गड्ड्यानावर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी आजही टोलनाक्यावर ठाण मांडले आहे.

दरम्यान, प्रशासन किंवा कारखानदार चर्चेसाठी पुढे येत नसल्याने विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणांतून संताप व्यक्त केला. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तोडगा न निघाल्यास आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.