कोल्हापूर : साखर उत्पादनाला बसणार फटका

कोल्हापूर : साखर उत्पादनाला बसणार फटका

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : वातावरणातील बदल आणि अनियमित पावसामुळे उसाच्या पिकावर मोठा परिणाम होत आहे. त्याचा फटका साखर उत्पादनाला बसणार आहे. यंदाच्या हंगामात राज्यात साखर उत्पादन तब्बल 30 ते 32 लाख मेट्रिक टनांनी घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये याचे परिणाम दिसणार आहेत.

गेल्या तीन वर्षांतील महाराष्ट्रातील साखर उत्पादनाचा आलेख पाहता 2021-2022 या गळीत हंगामात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली होती. त्यातून 137 लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. 2022 -2023 या हंगामात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेली वाढ आणि चांगले पीक यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा होती. राज्यात 138 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालय आणि राज्य सरकारने हंगाम सुरू होताना व्यक्त केला होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप होऊनही राज्यात 104 लाख 89 हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. यामध्ये मागील वर्षीची तुलना करता 30 ते 33 लाख मेट्रिक टनाची घट झाली.

राज्यातील सध्या उसाचे चित्र पाहता यंदा 128 लाख मेट्रिक टन म्हणजेच आधीच्या अंदाजापेक्षा 10 लाख मेट्रिक टनाने उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र आयुक्तालयाचा हा अंदाजही चुकण्याची शक्यता असून जास्तीत जास्त 105 ते 106 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, अशी भीती कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता असून महागाईतही वाढ होण्याची चिन्हे आहेत.

साखर उतार्‍यात 10 टक्के घट होणार

सध्या 2023-2024 च्या हंगामाची तयारी सुरु आहे. कृषी व साखर आयुक्तालयाच्यावतीने विभागनियहाय ऊस लागणीचा आढावा घेतला जात आहे. कोल्हापूर विभागाची नुकतीच आढावा बैठक झाली. उसाच्या लागणीमध्ये 10 हजार हेक्टरने वाढ आहे. पण मे मध्ये वळीव पावसाने आणि जूनमध्ये हंगामातील पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला. त्यामुळे उत्तार्‍यामध्ये 10 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

12 लाख टन ऊस इथेनॉलसाठी

काही कारखान्यांनी यंदा इथेनॉल उत्पादनावर अधिक भर दिल्यानेही साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी 12 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनासाठी लागणार्‍या उसापासून इथेनॉल उत्पादन करण्यात आले. यंदा त्यात पाच लाख मेट्रिक टनाची वाढ झाली असून 17 लाख मेट्रिक टन साखरेइतक्या उसापासून यंदा इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे. येत्या हंगामात इथेनॉलचे उत्पादन घेणारे किमान 100 कारखाने वाढतील असे चित्र आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 45 ते 48 लाख टन साखरेची मळी वापरली जाण्याचा अंदाज आहे. मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. सरकारी तेल कंपन्यांनी इथेनॉलसाठी चांगला दर देणे सुरु केले आहे. इथेनॉल विक्री झाल्यानंतर तातडीने कारखान्यांना पैसे मिळतात. या पैशातून शेतकर्‍यांना एफआरपी देणे शक्य आहे. यामुळे अनेक कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी तातडीने उपाय योजना सुरु केल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news