

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…' असा अखंड जयघोष करणारे आबालवृद्ध, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात पावसाच्या सरी झेलत गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी (सोमवारी) अनेक सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींच्या छोट्या-मोठ्या आगमन मिरवणुका काढल्या.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून कोसळणार्या पावसाच्या सरीत गणेश आगमनाचा उत्साह कायम होता. पावसामुळे कुंभार गल्ल्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे गर्दी नव्हती. सकाळपासूनच गणेशमूर्ती नेण्यासाठी लोक सहकुटुंब आले होते. काहींनी पायी तर अनेकांनी वाहनांतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ग्रामीण भाग व उपनगरासह पेठांमधील तालीम संस्था व तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती नेण्यासाठी वाहनांसह भाविक आले होते. अनेक तालीम मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमसह मिरवणुका काढल्या. पावसामुळे बहुतांशी गणेशमूर्ती प्लास्टिकमध्ये झाकूनच नेण्यात आल्या. वेगळेपण जपणार्या देखाव्यांचे नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
दुर्वा, फुले, खाऊची पाने, पूजेच्या साहित्यांसह गणेशाची आभूषणे, अष्टगंध, अत्तर, कापूर-उदकाडी, रुमाल, मोरया लिहिलेल्या पट्ट्या, स्कार्फ, टाळ यासह फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. पावसामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचीही तारांबळ उडाली होती.
गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशीपर्यंत शहरातील रस्ते व विद्युत तारांची देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने सुरूच होते. भरपावसात डांबरीकरण तसेच जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्याची आणि स्ट्रीटलाईटसह तारांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात भर पावसात कर्मचारी सक्रिय होते.
गणेशोत्सव दहा दिवसांचा असल्याने याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरगुती आरासमध्येही देखावे साकारण्यावर लोकांचा भर आहे. मंडळांनीही विविध विषयांवरील देखाव्यांची तयारी केली आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्येही वेगळेपण जपण्यासाठीचे नियोजन सुरूच आहे.
मंगळवारी गणेश चतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचे नियोजन महिनाभरापासून सुरू आहे. घराघरांत स्वच्छता व रंगरंगोटी करून गणेशासाठी नेत्रदीपक आरास करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, सप्तरंगी पताका, रांगोळ्यांचे सडे, आधुनिक प्रकारच्या शोभेच्या वस्तूंनी परिपूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणेशासमोर विविध विषयांवरील देखावे साकारण्याचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांशी पेठांमधील अनेक तालीम व मंडळांनी नियमांचे उल्लंघन करून नियमित जागेपेक्षा वाढीव जागेत गणेशोत्सवाचे मंडप उभारले आहेत. यामुळे अनेक महत्त्वाचे प्रमुख रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद झाले आहेत. याचा परिणाम गल्लीबोळातील रस्त्यांवर होऊ लागला आहे. गणेश आगमनाच्या मिरवणुका, खरेदीसाठी गर्दी आणि मांडवांमुळे रस्ते बंद असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी (सोमवारी) पारंपरिक पद्धतीने हरतालिका पूजन करण्यात आले. देवघरात केळीच्या खांबांनी सुशोभित केलेल्या चौरंगावर शंकर-पार्वतीची स्थापना करून धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली. वेली, फुले, पत्री अर्पण करण्यात आल्या. महिलांनी हरतालिकेचा उपवास धरला. बहुतांशी महिलांनी नियमित सोमवारच्या महादेवाच्या उपवासासह हरतालिकेचा उपवासही एकत्रितच केला.