कोल्हापूर : भुयारी मार्ग अन् उड्डाण पूल कागदावरच

कोल्हापूर : भुयारी मार्ग अन् उड्डाण पूल कागदावरच

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील एस. टी. स्टँड ते राजारामपुरी हा भाग रस्त्याद्वारे एकमेकांना जोडण्यासाठी महापालिकेने भुयारी मार्ग आणि उड्डाण पूल असे दोन प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय अनास्थेसह राजकीय इच्छाशक्तीही अपुरी पडत आहे. रेल्वे विभागाने पादचार्‍यांची रेल्वे रूळावरून ये-जा बंद करण्यासाठी दोन्ही बाजूने भिंत उभारली आहे. त्यामुळे नागरिक परिख पुलाखालून वाहनांच्या गर्दीतच ये-जा करत आहेत. परिणामी, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.

रेल्वेमुळे शहराचा उत्तर-दक्षिण संपर्क तुटला आहे. शहरातील वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेले एस. टी. स्टँड आणि मुख्य बाजारपेठ बनलेल्या राजारामपुरी परिसराचा त्यात समावेश आहे. जीर्ण झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या परिख पुलाखालून जीव मुठीत घेऊनच वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात तर अनेकवेळा वाहतूक बंद असते. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा म्हणून महापालिकेने भुयारी मार्ग आणि उड्डाण पूल असे दोन्ही प्रस्ताव तयार केले आहेत. भुयारी मार्ग सुमारे दीडशे मीटर लांब आणि 33 फूट रूंद असून सुमारे 15 कोटी रु. लागणार आहेत.

एस. टी. स्टँडजवळील महालक्ष्मी चेंबर्स ते साईक्स एक्स्टेंशन चौकाच्या अलिकडेपर्यंत सिंगल ट्रॅक भुयारी मार्ग धरण्यात आला आहे. दोन्ही बाजूने लाईट व्हेईकल ये-जा करू शकतील. पादचार्‍यांसाठी फुटपाथही ठेवण्यात आला आहे. पाच बंगला परिसराकडूनही एस. टी. स्टँडकडे येणार्‍यांसाठी रस्ता असेल. तसेच पाच बंगल्याकडून टाकाळा उड्डाण पुलाकडेही जाता येणार आहे. त्यासाठी सध्या असलेल्या रस्त्याचा वापर करता येईल. स्टँडवरून टाकाळा उड्डाण पुलाकडे जाणार्‍या वाहनांना परिख पुलाखालून जाता येणार आहे. महापालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट संदीप गुरव यांनी हा आराखडा तयार केला आहे. त्याबरोबरच एस. टी. स्टँड ते राजारामपुरीसाठी उड्डाण पुलाचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी सुमारे 150 कोटी निधी आवश्यक आहे. या मार्गाची लांबी सुमारे 1300 मीटर आहे.

भुयारी मार्गाला रेल्वेची नकारघंटा…

महापारलिकेने परिख पुलाऐवजी वाहतुकीसाठी भुयारी मार्गाचा आराखडा आणि प्रस्ताव तयार करून रेल्वे विभागाला सादर केला होता. त्यानुसार अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणीसुद्धा केली. रेल्वे विभागाने महापालिकेला डिपॉझिट म्हणून 10 लाख रु. भरण्याची सूचना केली होती. 23 डिसेंबर 2022 रोजी रेल्वे विभागाने रेल्वेच्या खालून भुयारी मार्ग शक्य नसल्याचे महापालिकेला कळवले. तसेच 10 लाख रु. डिपॉझिटही परत पाठवली. याठिकाणी भुयारी मार्गाऐवजी उड्डाण पुलासंदर्भात सूचना केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news