‘गोकुळ’च्या सभेत गोंधळातच विषय मंजूर

‘गोकुळ’च्या सभेत गोंधळातच विषय मंजूर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी प्रचंड गोंधळात झाली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय गोंधळातच मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी आघाडीच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणांमुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला. तासभर ही सभा चालली.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना परिसरात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील उपस्थित होते. दरम्यान, बोलण्यास संधी नाकारल्याच्या निषेधार्थ संचालिका शौमिका महाडिक यांनी समांतर सभा घेत विषय नामंजूर असल्याचे सांगितले. सभा सुरू होण्यापूर्वी काही मिनीट अगोदर विरोधक घोषणा देतच सभा मंडपात आले. त्यांच्या घोषणा सुरूच होत्या.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांचे व्यासपीठावर आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. शांत राहण्याचे आवाहन करूनही कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गोंधळातच सभा सुरू केली. श्रद्धांजली ठरावाचे वाचन करताना मध्येच राष्ट्रगीत लावण्यात आले. ते पूर्ण होण्याअगोदरच बंद केले. या गोंधळातच अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभा सुरू केली.

ते म्हणाले, गोकुळ दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवूनच काम करते. 1 रुपयातील 82 पैसे दूध उत्पादकाला दिले जाते. यावर्षीचा अंतिम दूध फरक दिवाळीपूर्वी देण्यात येईल. स्वभांडवलातून केलेल्या 88 कोटींच्या गुंतवणुकीमुळे ठेवीमध्ये 31 कोटी 87 लाखांची घट दिसते. वाशीत पॅकिंगची स्वतंत्र यंत्रणा उभारल्यामुळे 12 कोटींची बचत होणार आहे. नवीन दूध संस्था वाढल्यामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. पेट्रोल पंपासही मंजुरी मिळाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दूध विक्रीत 1 लाख लिटरने वाढ झाली आहे.

डोंगळे यांचे भाषण संपले तरी गोंधळ सुरूच होता. यानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषय पत्रिकेचे वाचन सुरू केले. विषयाचे वाचन झाल्यानंतर मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी सभामंडप दणाणून गेले. अखेर या गोंधळातच विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर केले.

सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना डोंगळे यांनी सविस्तर उत्तरे दिली. यानंतर अन्य कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी बोलावे, असे डोंगळे यांनी सांगितले. शौमिका महाडिक बोलण्यास उभ्या राहिल्या. त्याला डोंगळे यांनी हरकत घेत, संचालकांनी सर्वसाधारण सभेत बोलू नये, असे सांगितले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने पुन्हा गोंधळ वाढला. बोलण्यास परवानगी नाकारल्याचा निषेध करून महाडिक सभेतून निघून गेल्या.

सभेस ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव उपस्थित होते. आभार संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले.

'माईकला करंट येत होता', असा आरोप महाडिक यांनी केला. माईकला करंट बसत असल्याची माहिती त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिली. त्यामुळे त्यांना माईक बदलून दिला मात्र बोलण्याची संधी त्यांना मिळाली नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news