

Mother's Day Special Kolhapur Story
कोल्हापूर : परागंदा पतीच्या पश्चात भाजी विकून मुलाला उच्चशिक्षित करताना संघर्षाची वाट तुडवत राहिली. पण, आज त्याच मुलाला आई नकोशी झाली. काळजाला घर पाडणाऱ्या या पोरकेपणासोबत अंजना सूर्यवंशी ही माऊली उतरत्या वयात भाजी विक्री करून जगत आहे. कळंबा परिसरातील अंजना अनिल सूर्यवंशी यांच्या आईपणाचा हा प्रवास स्वाभिमानाचा परिपाठ देत आहे.
अंजना या सध्या साठीच्या उंबरठ्यावर आहेत. पती अनिल यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मुलगा दोन वर्षांचा आणि मुलगी सहा महिन्यांची असताना एके दिवशी व्यसनी पती अनिल घरातून कायमस्वरूपी निघून गेले अन् अंजना यांची मातृत्वाची लढाई सुरू झाली. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित झाली. मुलीचे लग्न करून दिले. मुलाला पॅथॉलॉजीमध्ये चांगली नोकरी मिळाली. त्याचे लग्न करून दिले. आता अंजना यांचे कष्ट संपतील, असे वाटत असताना मुलाने आईला दूर लोटले. तरीही त्या माऊलीने कष्ट करेन; पण स्वाभिमानाने जगेन, हाच मंत्र जपला.
पै-पै साठवून कळंब्यात अंजना यांनी छोटी जागा घेऊन घर बांधले. कष्टाची कमाई करून अंजना उदरनिर्वाह करतात. मुलांना मोठं करणे, त्यांना शिक्षण देणे, ही आई म्हणून माझी जबाबदारी होती. त्यांनी कसे वागायचे, हे त्यांनी ठरवायचे, असं म्हणत अंजना यांनी मातृत्वातील मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे.