

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
सायकलवरून जात असणाऱ्या विद्यार्थिनीच्या पाठीमागं भटकी कुत्री लागली अन् घाबरलेली विद्यार्थिनी सायकलवरून वेगाने जात एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये दहा ते पंधरा फुटांवरून खाली कोसळली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, इचलकरंजीतल्या मराठी मिल चौकात सायकलवरून शिकवणीला चाललेल्या विद्यार्थिनीच्या पाठीमागे भटकी कुत्री लागली. भटकी कुत्री पाठीमागे लागल्याने घाबरलेली विद्यार्थीनी वेगाने सायकल चालवत चौकातून वळली. तेवढ्यात तीचे सायकलवरचे नियंत्रण सुटून ती सायकलवरून उडून इमारतीच्या बेसमेंटमध्ये पडली. यामध्ये विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदिनी विजय वाइंगडे असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
दरम्यान शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. रात्री उशिरा दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच सकाळी वर्दळ कमी असताना दुचाकींच्या मागे भटकी कुत्री लागतात. बंदोबस्त करावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.
या संपूर्ण घटनेचे दोन सीसीटीव्ही समोर आले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थिनी सायकलवरून थेट बेसमेंटमध्ये कोसळताना दिसते आहे. या व्हिडिओत विद्यार्थिनी सायकलवरून जाताना काही कुत्री तीच्या पाठीमागे लागल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे कुत्री दुचाकीधारकांच्या मागे लागतात. यामुळे घाबरून वाहनधानक वाहनाचा वेग वाढवतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
नागरिकांना रोज अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मनपाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यांचे निर्बिजीकरण करावे. अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात येत आहे.