
कोल्हापूर : पहलगामचा हल्ला करण्याचे धाडस परकीय मदतीवर जगणार्या पाकिस्तानात नाही. भारताला विकासाच्या मार्गाने पुढे जायचे आहे. भारत आता विकसित होत आहे. हे अनेक देशांना खुपत आहे. यामुळे पहलगामवरील हल्ला करण्याचे धाडस एकट्या पाकिस्तानात नाही. तो आंतरराष्ट्रीय कट असू शकतो, असे सांगत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकिस्तानाला धडा शिकवलाच; पण चीनलाही ठोस संदेश दिला. अनेक देशांना उघडे पाडले. भारत हा पाकिस्तान-चीनचे काहीही करू शकत नाही, हा अनेक वर्षे सुरू असलेला बागुलबुवा फाडून टाकला, असे प्रतिपादन राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मंगळवारी केले. भारताचा विकास होणे ही आता काळ्या दगड्यावरील पांढरी रेष आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याला कोणीही अडवू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत-पाकिस्तान युद्ध : सद्य:स्थिती’ या विषयांवर डॉ. देवळाणकर बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. यावेळी खासदार शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
डॉ. देवळाणकर म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्राची निर्मिती एकाचवेळी झाली. मात्र पाकिस्तानने नेहमी दहशतवाद जोपासला तर भारताने अर्थव्यवस्था मजबुतीकडे लक्ष केंद्रित केले. पाकिस्तान कंगाल बनला असून भारत विकसीत राष्ट्रांच्या रांगेत उभा आहे. भारताचे विकासाच्या मार्गावरील लक्ष विचलित करण्यासाठी दहशतवादी हल्ला हा आतंरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो. मात्र, असे हल्ले भारताला नवीन नाहीत. भारताने त्याला कधी भीक घातली नाही. मात्र, यावेळी भारताने प्रतिरोधन पद्धतीने जशास तसे उत्तर देऊन पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकविला. पाकिस्तानातील नऊ दशहतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. तुमचे एकही शहर सुरक्षित नाही हे पाकिस्तानला दाखवून दिले.
पाकिस्तानने भारताला कायम न्यूक्लिअर ब्लॅकमेल केले होते. तुम्ही हल्ला केला तर आम्ही अण्वस्त्राने हल्ला करू, अशी वल्गना पाकिस्तान करत होते. यामुळे अणुबॉम्बचा वापर झाला तर संपूर्ण आशिया खंडाला त्याची झळ बसेल, अशा मानसिकतेत आपण होतो. मात्र भारताने आता आपली मानसिकता बदलली. आम्ही प्रथम अण्वस्त्र हल्ला करणार नाही. मात्र, तुम्ही केला तर तेवढाच प्रतिहल्ला आम्हीही करू, असा संदेश देत पाकिस्तानात घुसून हल्ला केला. पुलवामा, ऊरीनंतर तत्काळ भारताने रिअॅक्शन दिली. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानाने प्रतिरोधन पद्धतीने रिअॅक्शन दिली. तुम्ही हल्ला केला तर उद्ध्वस्त करू, असा संदेश प्रथमच देत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताची संरक्षण सज्जता जगाला दाखवून दिली. ब—ह्मोस, आकाश क्षेपणास्त्र या भारतीय बनावटीच्या आयुधांची एकप्रकारे चाचणी केली, त्यातून कमालीचा आत्मविश्वास वाढला असे सांगत डॉ. देवळाणकर म्हणाले, चीनने पाकिस्तानला आपली हत्यारे दिली, तंत्रज्ञान दिले. मात्र, त्यांच्या या वल्गना होत्या, हे सिध्द झाले, त्यांची सर्वच आयुधे कुचकामी ठरली. भारत-चीन संघर्षांत भारताचा निभाव लागणार नाही, चीन वरचढ ठरेल असे म्हणणार्या चीनचे बार फुसके निघाले. यामुळे भारत-चीन संघर्ष झाला तरी आपणच वरचढ ठरू असेही ते म्हणाले.
पहलगाम हल्लापूर्वीचा घटनाक्रम समजून घेणे आवश्यक आहे, असे सांगत डॉ. देवळाणकर म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घेतले. 150 देशांत टेरिफ लावले. चीनला 249 टक्के टेरिफ लावतानाच अन्य देशांसारखी 90 दिवसांची मुदतही दिली नाही. यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प चीनमधून हलवण्यास सुरुवात केली. त्यातील काही प्रकल्प भारतातही स्थलांतरित होऊ लागले. यामुळे चीनला भारत हा पर्याय असू शकते, याची संपूर्ण जगभर चर्चा सुरू झाली. भारताचे कौतुक व्हायला लागले. भारताने विकासाची योजना आखली असताना, भारत विकासाच्या मार्गावर असताना पहलागम घडते याचा अर्थ काय, असा सवाल ही त्यांनी केला.
चीनच्या सीमेला लागून 19 देशांच्या सीमा आहेत. या देशातून वाहणार्या 19 नद्या 17 देशात जातात. मात्र त्यांनीच काय, जगात कोणीही पाणी वाटपाचा करार केलेला नाही. मात्र भारताने सिंधू पाणी वाटपाचा 1960 साली करार केला आहे, त्यातही पाकिस्तानाकडे 80 टक्के अधिकार दिले आहेत. या पाण्याच्या जीवावर पाकिस्तानातील 80 टक्के शेती व 40 टक्के उद्योग अवलंबून आहेत. पाकिस्तानची हीच दुखती नस भारताने दाबली. सिंधू करार रद्द केला. त्याचे परिणाम काही वर्षांतच दिसतील. पाणी बंद केल्याने भविष्यात पाण्याची साठवणूक करणे, त्याकरिता धरणे बांधणे ही दीर्घकालीन कामे करावी लागतील. मात्र अल्पकालीन कामे म्हणून या धरणतील पाण्याची आकडेवारी देणे बंद केले. या धरणांवर पाकिस्तानी अधिकार्यांचे प्रवेश रोखले तरी पाकिस्तानी जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानमधील जनतेला त्रास होत नाही. तोपर्यंत ती लष्कर, सरकार आणि आयएसआय यांच्याविरोधात उठाव करणार नाही आणि दहशतवादी संपवणार नाही, असेही डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.
अमेरिकेने पाकिस्तानवर दबाब आणला, भारतावर नव्हे असे सांगत डॉ. देवळाणकर म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नेहमी चर्चेत राहणे आवडते. यामुळे शस्त्रसंधीबाबत त्यांनी पाकिस्तावर दबाव आणला. भारताने 1990 पासून आर्थिक उदारीकरण सुरू केले होते. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या भारत 2021 पर्यंत परिपक्व होणार होता. मात्र, कोरोनाचा अडथळा आला. आता अन्य देश म्हातारे होत असताना भारत मात्र तरुणांचा देश बनत चालला आहे. भारताला विकासाच्या, शांततेच्या मार्गाने पुढे जायचे आहे. त्यासाठी संवादाची गरज आहेच. या तरुणांच्या जोरावर भारत विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. त्याकरिता पायाभूत सुविधा, थेट परदेशी गुंतवणूक आणि कौशल्य विकास या टप्प्यांवर उच्च शिक्षणाचे धोरण निश्चित केले जात आहे, असे सांगतानाच पाकिस्तान मात्र त्याच्या कर्मानेच मरणार आहे, असेही डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.
भारताने दहशतवादाविरोधात सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही. ते केवळ स्थगित केले आहे. ते केव्हाही सुरू होऊ शकते, असेही डॉ. देवळाणकर यांनी सांगितले. अनेक राष्ट्रे आता आत्मकेंद्रित होत आहेत. अशावेळी आपला संघर्ष आपल्यालाच सोसावा लागणार असला तरी भारत सर्वदृष्टीने सक्षम झाला आहे. त्यामुळेच भारतातून सरंक्षण साहित्यांची निर्यात वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत हा आता गहू आणि मिसाईलही उत्पादित करणारा देश ठरला आहे. अमेरिकासारखा देश अजूनही 80 टक्के वस्तू आयात करतो. अनेक देश युद्धजन्य परिस्थितीत अन्नधान्यासाठी कंगाल होतात. भारत मात्र आता संरक्षण क्षेत्रात आणि अन्नधान्यातही स्वयंपूर्ण झाला आहे, असेही डॉ. देवळाणकर म्हणाले.
अध्यक्षस्थीय समारोपात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, व्याख्यानमालेत आजपर्यंत कोणत्याही क्षेत्राशी संबंधित विषय सुटलेला नाही. या सर्व व्याख्यानात राष्ट्रवाद आणि देशप्रेम हा महत्त्वाचा समान धागा राहिला आहे. ही व्याख्यानमाला समाजाशी संवाद घडवून आणते. भारताचा विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. विद्यापीठे, महाविद्यालयात देशभक्ती आठवडा साजरा केला जात आहे. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून विद्यार्थी व समाजाता देशभक्ती रुजविण्याचे काम केले आहे. पहलगाम युद्ध हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. हा संदेश समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. भारताचा विकास जगातील विविध देशांच्या डोळ्यात खुपत आहे. विकास पुढे जाणार नाही, यासाठी पाकिस्तानसह जगातील विध्वंसक देश प्रयत्न करीत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी अदृश्य शक्ती काम करीत आहे. सुटा-बुटातील लोकांपुरते मर्यादित असणारे परराष्ट्र धोरण समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सर्व धोरणे ही सामान्यांच्या रोजी-रोटीशी संबंधित असतात हे यानिमित्ताने अधोरेखित झाल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले.
विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. शिवाजी विद्यापीठातर्फे उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे व सहायक कुलसचिव आर. आय. शेख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.