

कोपर्या-कोपर्यांवर चहा, वडापाव, बिर्याणी, चिकन 65 च्या गाड्या दिसतात; पण आता अशा पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही. विविध खाद्यपदार्थ तयार करून विक्री करायची झाली, तर त्यासाठी प्रशिक्षण घेऊन 50 गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा पास होणे सक्तीचे आहे. यामुळे यापुढे खाद्यपदार्थ तयार करणारा प्रशिक्षणधारकच असणार आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने खाद्यपदार्थ तयार करणे व हाताळणी करणार्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात प्राधिकरणाने कार्यशाळा घेतली. हॉटेलमालक संघाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या कार्यशाळेत सुमारे 150 प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेनंतर उपस्थित प्रतिनिधींची त्याच ठिकाणी परीक्षा घेतली. त्यात अनेकजण अनुत्तीर्ण झाले. आता अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्याची सुविधा आहे. जोपर्यंत तो व्यावसायिक या परीक्षेत पास होणार नाही, तोपर्यंत त्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे.
हॉटेलचालक-मालक, कुक, आईस्क्रिम गाडीचा चालक-मालक, वडापाव गाडीचालक, चहाची टपरीचालक, घरपोच भोजन पुरवठा करणारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, केक-खवा तयार करणारे व्यावसायिक यासह सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणार्यांना आता हे प्रशिक्षण आणि परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे.
दूध संकलन करणार्या प्राथमिक दूध संस्थांतील कर्मचार्यांनाही असे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानंतर परीक्षाही द्यावी लागणार आहे. दूध हाताळणी ज्या प्रकल्पांमध्ये होते, त्या प्रकल्पधारकांनाही आपल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.