

Maharashtra ST Employees Protest
गुडाळ : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यासाठी एसटी मधील सर्व संघटना एसटी कामगार संयुक्त कृती समिती च्या नावाखाली एकत्र आल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. एसटी मध्ये विविध पक्षांच्या आणि विविध विचारांच्या अनेक कर्मचारी संघटना आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, भाजपा प्रणित महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, शिवसेना (ठाकरे) प्रणित महाराष्ट्र एसटी कामगार सेना, शिवसेना (शिंदे) प्रणित शिव परिवहन वाहतूक सेना, काँग्रेस प्रणित महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटना आदी प्रमुख संघटना सह अनेक छोट्या -मोठ्या संघटना कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी या सर्व संघटना संयुक्त कृती समिती म्हणून आंदोलन छेडणार आहेत.
एसटीचे टप्प्याटप्प्याने सुरू असलेले खाजगीकरण बंद करावे, कंत्राटी भरती बंद करावी, खाजगीकरणातून महामंडळांच्या जागांचा विकास न करता महामंडळाने स्वतः करावा, दिवाळी साठी 15,000 रुपये भेट आणि करारातील तरतुदीप्रमाणे दिवाळी निमित्त 12,500 रुपये सण उचल द्यावी, घर भाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीच्या दरामध्ये एकतर्फी कपात करून करार भंग करू नये.आदी अनेक मागण्यासाठी हे संयुक्त आंदोलन करण्यात येणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
दरम्यान,13 ऑक्टोंबर पासून संयुक्त कृती समिती चे आंदोलन सुरु होणार असून प्रवाशांचे ऐन दिवाळीत मोठे हाल होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष प्रणित संघटनांनी एकत्रित येऊन छेडलेले आंदोलन सरकार कसे हाताळणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.