

कोल्हापूर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भुदरगड तालुक्याच्या समृद्ध वनक्षेत्रात अत्यंत दुर्मीळ आणि निसर्गाशी एकरूप होणारा ‘श्रीलंकन फ्रॉगमाऊथ’ हा पक्षी प्रथमच आढळून आला आहे. मराठीत याला बेडूक तोंड्या असे म्हणतात. आपल्या विशिष्ट शरीर रचनेमुळे आणि झाडाच्या फांदीसारख्या दिसण्यामुळे हा पक्षी सहजासहजी नजरेस पडत नाही. कारण, त्याचं अस्तित्व तुरळक ठिकाणी जंगल भागात आहे.
हा पक्षी प्रामुख्याने पश्चिम घाट आणि श्रीलंकेत आढळतो. याचा आकार साधारणपणे रातव्यासारखा असतो; मात्र याचे तोंड बेडकासारखे रुंद असल्याने याला ‘फ्रॉगमाऊथ’ असे नाव पडले आहे. दिवसा एखाद्या वाळलेल्या फांदीसारखा स्तब्ध बसून राहण्यात हा पक्षी पटाईत असल्याने याला शोधणे कठीण असते. हे पक्षी निसर्गचक्रातील कीटक नियंत्रणाचे महत्त्वाचे काम करतात.
श्रीलंकन फ्रॉगमाऊथसारखे दुर्मीळ पक्षी घनदाट आणि आर्द्र जंगलात राहणे पसंत करतात; मात्र सध्या भुदरगड तालुक्यासह संपूर्ण सह्याद्री पट्ट्यात ‘वणवा’ लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर निसर्गप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.