Keshavrao Bhosale Natyagruha : तुम्हा तो शंकर सुखकर हो!

तुम्हा तो शंकर सुखकर हो!
Keshavrao Bhosle Theater
केशवराव भोसले नाट्यगृह File Photo
Published on
Updated on
सुरेश पवार

Keshavrao Bhosale Natyagruha : (स्वर्गातील कला मंदिर दालन. खिन्न, उदास स्वरांचे पार्श्वसंगीत सुरू आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, मा. दीनानाथ, नानासाहेब फाटक, छोटा गंधर्व, डॉ. श्रीराम लागू, पं. वसंतराव देशपांडे, डॉ. काशीनाथ घाणेकर आदी नटसम्राट, नटशार्दूल विमनस्क मन:स्थितीत बसले आहेत.)

केशवराव भोसले : (शांतता असह्य होऊन) अहो, सर्वांनीच असं गप्प गप्प राहून कसं चालेल? आमच्या छत्रपती शाहू महाराज साहेबांनी बांधलेले पॅलेस थिएटर खाक झाले. थिएटर जळाले आणि हजारो आठवणी, भस्मसात झाल्या. आपल्या सर्वांचे परमधाम नाहीसे झाले. धैर्यधर म्हणून माझा नावलौकिक; पण मला आता दुःखाचे कढ आवरत नाहीत.

Keshavrao Bhosle Theater
Earthquake in Russia | रशिया भूकंपाने हादरला; ज्वालामुखीचा उद्रेक; त्सुनामीचा इशारा

बालगंधर्व : देवा, मला का दुःख कमी झालेय? याच थिएटरात उद्घाटनाला आमचेच ‘स्वयंवर’ होते ना! असा बालगंधर्व पुन्हा न होणे, असे कुणी तरी म्हटलेय... पण, असे थिएटर उभ्या भारतवर्षात नव्हते. आज-काल स्पीकरशिवाय शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोहोचत नाही म्हणतात; पण या थिएटरात शेवटच्या प्रेक्षकापर्यंत कोणाचाही आवाज सहज पोहोचत होता. मंद्र सप्तकातील आवाजही रोमांच उठवत होता आणि केशवराव, तुमची तर साडेतीन सप्तकातील तान थिएटरबाहेर कडाडून जायची.

Keshavrao Bhosle Theater
सांगली : डॉक्टरांच्या संपामुळे जिल्ह्यातील सेवा ठप्प

नानासाहेब फाटक : हरहर! काय झाले हे! होत्याचे नव्हते झाले. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, अशी अवस्था झालीय. कुणा दुष्टाची आमच्या या पवित्र वास्तूला द़ृष्ट लागली?

डॉ. श्रीराम लागू : कुणी थिएटर देईल का, थिएटर, असे म्हणायची वेळ आली आहे. हे परमेश्वरा, जगनियंत्या आम्हावर काय हा प्रसंग ओढवलाय?

डॉ. काशिनाथ घाणेकर : या आगीमागचे करंटे हात गवसले असते, तर नाट्यगृहाच्या महाद्वारी रक्ताचा सडाच पडला असता! टकमक टोकावरून कडेलोटच केला असता!! किती दुःख करावे... दुःखाला दिवसांची लक्ष्मणरेषा असती, तर किती बरे झाले असते.

मा. दीनानाथ : आपल्या सर्वांच्या मर्मबंधातली ठेव पाहता पाहता हरवली. ‘सुकतातचि जगी या’ याप्रमाणे नाहीशी झाली. पुन्हा कधी, केव्हा फुलेल कोण सांगणार?

छोटा गंधर्व : अहो, या थिएटरात सौभद्रातील पद म्हणताना खरोखर पहाट व्हायची हो..... रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा... खरंच उषःकाल व्हायचा. कसा होता तो ‘या नव नवल नयनोत्सवा...!’

बालगंधर्व : खरंच, सौदागर, खरंच, या थिएटराने असे लाखो-लाखो मंतरलेले क्षण मायबाप प्रेक्षकांना दिले. हे संचित आता कुठे मिळणार! आता ‘वद जाऊ कुणाला शरण’ अशी आळवणी कुणाची करावी बरे?

केशवराव भोसले : नका नारायणराव, एवढे हवालदिल होऊ नका. आपला नटेश्वर आणि आपले मायबाप प्रेक्षक यातूनही नवे घडवतील.

पं. वसंतराव देशपांडे : होय,‘ या भवनातील गीत पुराणे, मवाळ, हळवे सूर...’ आता हे सूर दूर जाऊ द्यात. नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने, नव्या थिएटरसाठी आपल्या नटेश्वराची आपण मन:पूर्वक प्रार्थना करूयात! सर्व जण : होय, होय. नटेश्वराला शरण जाऊ या! (गातात)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news