सांगली : डॉक्टरांच्या संपामुळे जिल्ह्यातील सेवा ठप्प

कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ संप
Kolkata Rape And Murder
सांगली : शहरात शनिवारी सायंकाळी आयएमएतर्फे कँडल मार्च काढण्यात आला.Pudhari photo
Published on
Updated on

कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेला अमानुष अत्याचार व तिच्या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ येथील वैद्यकीय क्षेत्रात शनिवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सांगलीसह जिल्ह्यातील डॉक्टरांनी शनिवारी तातडीची सेवा वगळता संप पुकारला होता. त्याला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वैद्यकीय सेवा ठप्प झाली होती. निवासी डॉक्टरांनी मोर्चा काढत ठिकठिकाणी निदर्शने केली, तर आयएमएतर्फे कँडल मार्च काढून निषेध नोंदवला.

कोलकाता येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह जिल्ह्यातून डॉक्टरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तातडीची सेवा वगळता संपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्याला डॉक्टरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतेक रुग्णालयांत वैद्यकीय सेवा ठप्प होती.सायंकाळी आयएमए हॉलपासून कँडल मार्च काढण्यात आला. हा कँडल मार्च पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत आला. डॉक्टरांना संरक्षण देण्यात यावे, कोलकाता येथील प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, त्या पद्धतीने संसदेत कायदा करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी, डॉ. रोहन ठाणेदार, महिला विभागाच्या डॉ. अपर्णा पुरोहित, डॉ. निधी पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, डॉ. रवींद्र होरा, डॉ. शिरीष काळे आदी सहभागी झाले होते.येथील वैद्यकीय सिव्हिल रुग्णालयातील निवासी डॉक्टरही आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे अडीचशे डॉक्टरांनी शहरातील विविध मार्गावर मोर्चा काढून निदर्शने केली. डॉक्टरांना संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा, तसे लेखी आश्वासन देण्यात यावे. रुग्णालयामध्ये व वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. या आंदोलनात निवासी डॉ. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमोल बडबडे, डॉ. एम. फातिमा, प्रशांत विधाते आदी सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news