कोल्हापूर : साऊंड सिस्टीमचा दणदणाट, लेसर शोचा झगमगाट अपायकारक

कोल्हापूर : साऊंड सिस्टीमचा दणदणाट, लेसर शोचा झगमगाट अपायकारक

कोल्हापूर, एकनाथ नाईक : गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली साऊंड सिस्टीम, लेसर शो शरीराला अपायकारक आहेत. यांचा डोळे, कान आणि हृदयावर गंभीर परिणाम होत आहेत. गत मिरवणुकीमध्ये 100 हून अधिक जणांच्या डोळ्याला लेसर शोने, तर साऊंड सिस्टीममुळे अनेकांच्या कानठळ्या बसून हृदयाची धडधड वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात आणि विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि लेसर शोचा झगमगाट असतो. याचा गंभीर परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे अतितीव्र क्षमतेच्या लेसरचा वापर टाळणे योग्यच आहे. सण, उत्सव, विवाह सोहळा किंवा अन्य मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टिमसोबत लेसर शोचे फॅड तरुणाईमध्ये आहे. मिरवणुका आकर्षक बनवण्यासाठी अतितीव्र लेसर, साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाचा वापर केला जातो.

लेसर शोमधून बाहेर पडणारी अतितीव्र किरणे, साऊंड सिस्टीमच्या आवाजाने अनेकांच्या जीवनात 'अंधार' आला आहे. लेसर किरणांचा वापर उद्योग धंदे, वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जातो. त्याच्या वापरात जरा चूक झाली, तर गंभीर परिणाम होतो. त्यामुळेच लेसरच्या उपकरणांवर इशारा सूचना लिहिलेल्या असतात, तरीही लेसरचा सर्रास वापरण मिरवणुकांमध्ये केला जातो. लेसरची तीव्र किरणे डोळ्यांवर इजा करतात. साऊंड सिस्टीमच्या आवाजाने कानाचा पडदा निकामी होणे, हृदयाची धडधड वाढणे अशा तक्रारी पुढे आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news